भाजपला मतदान करणार नाही, असा निर्धार करा आणि केंद्र आणि राज्यातून भाजपला हद्दपार करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच तुम्ही वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या, मी पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांना तिहार तुरुंगात घालून दाखवतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राहुरीत वंचित बहुजन आघाडीच्या पेठेत झालेल्या सभेत आंबेडकर बोलत होते.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील सर्वांत मोठे चोर नरेंद्र मोदी आहेत. न खाऊंगा न खाने दुंगा, अशी घोषणा करणारे मोदी हे फक्त गुजरातला खाऊ घालतात. ते केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत. मोदींना कैद करायचे असेल तर भाजपला मतदान करणार नाही, असा निर्धार सर्वांनी केला तरच मोदी तिहारच्या जेलमध्ये दिसतील.
भाजपने आरक्षण बाजूला केले
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशात शस्त्र बाळगण्याचा अधिकार संघवाल्यांना कोणी दिला? असा सवाल करत शस्त्र पूजनाच्या कार्यक्रमात ते एके-47, एके-86 अशा घातक शस्त्रांचे पूजन करतात. या विरोधात आपण फिर्याद दाखल करणार आहोत. दरम्यान, गरीब मराठय़ांच्या आरक्षणाचे ताट भाजपने बाजूला काढले. त्याच भाजपबरोबर श्रीमंत मराठा नेते गेले आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी गरीब मराठय़ांनी वंचित आघाडीबरोबर यावे. सत्ता दिल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टातून मार्गी लावण्यास कटिबद्ध आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
निवडणुका आल्यावर दंगली घडवल्या जातात
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील लोकशाही, प्रशासकीय यंत्रणेमार्फत देशविरोधी कारवाई करणाऱयांना तुरुंगात टाकण्याची तरतूद आहे. त्याच आधाराने आपण हे निवेदन करत असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. निवडणुका जवळ येतील तशा दंगली घडविल्या जातील. त्यामुळे 18 पगड जाती एकत्र राहिल्या तर आरएसएसवाले काहीही करू शकणार नाहीत. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होऊनही पंतप्रधान मोदी यांनी 85 दिवस मौन पाळले. मोदी त्यांच्या घरातील महिलांना न्याय देऊ शकले नाहीत. ते त्यांच्या आईला सांभाळू शकले नाहीत; ते देशातील महिलांना काय न्याय देणार, असा सवाल आंबेडकर यांनी केला.