सत्ताधारी सरकार आणि त्यांचे नेते विरोधात असताना मराठा आरक्षणाची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यानंतर समाजाला काय देत आहेत ते पहा ! प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा आणि मागण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे निषेधार्ह आणि अत्यंत निषेधार्ह आहे. एआयएमआयएम मराठ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देत आहे, असे मत एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत या प्रकरणी बंद व रास्ता रोकोचे हत्यार उपसण्यात आले. अनेक ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

इम्तियाज जलीलांचे ट्विट काय?
खासदार इम्तियाज जलील ट्विटमध्ये म्हणाले की, मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहे. सत्ताधारी सरकार आणि त्यांचे नेते विरोधात असताना मराठा आरक्षणाची मागणी करत होते पण सत्तेत आल्यानंतर समाजाला काय देत आहेत ते पहा! प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा आणि मागण्याचा अधिकार आहे पण त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे निषेधार्ह आणि अत्यंत निषेधार्ह आहे. एआयएमआयएम मराठ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देत आहे.
सरपंचाने गाडी पेटवली
छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध करत स्वत:चीच कार पेटवून दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गाडी पेटवून देत असतानाच ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.
सरकारला धरले धारेवर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारला एवढे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न करत मराठी माणसाच्या आक्रोशातून उभे राहणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
नेमके काय घडले?
गावात आंदोलन अगदी शांततेच्या मार्गाने सुरू होते. घटनास्थळी अचानक 200 ते 250 पोलिसांचा ताफा दाखल झाला. उपजिल्हाधिकारी व अपर पोलिस अधीक्षक यांनी आंदोलनाचे आयोजक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे सांगत त्यांनी आंदोलन स्थळावरील संयोजकांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बोलावून घेतले. जरांगे यांना रुग्णालयात दाखल करायचे आहे, असे त्यांनी म्हटले. आंदोलनकर्त्यांनी याला संमती दर्शवली. पण शासकीय डॉक्टरऐवजी आंदोलनकर्त्यांनी दुसरा एमबीबीएस डॉक्टर बोलवून तपासणी करून घेतो तसेच आवश्यकता असल्यास उपचार करण्याची तयारीही संयोजंकांनी दाखवली. अधिकारी व संयोजक उपोषण स्थळावरून बाहेर पडले. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. पण उपाेषणस्थळी पोहोचताच पोलिसांनी ग्रामस्थांना गराडा घालत जरांगे पाटील यांना ताब्यात घेण्यास जात असताना उपोषणकर्त्यांनी त्यांना विरोध केला. येथेच वादाची ठिणगी पडली.