• Wed. Apr 30th, 2025

लाठीचार्जवरून वातावरण तापलं!:अन् ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी

Byjantaadmin

Sep 3, 2023

एकीकडे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. शिंदे-फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. अशातच आज राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज बुलढाणा जिल्ह्यात पार पडत आहे. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, संजय राठोड, गुलाबराव पाटील हे मंत्री उपस्थित आहेत.. मात्र, आजच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजरी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पण त्यांच्या अनुपस्थितीचे कारण थेट मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी स्पष्ट करत या चर्चेवर पडदा टाकला आहे.

 

दोन्ही DCMची गैरहजेरी बनला चर्चेचा विषय
आतापर्यंत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असायचे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर ते देखील शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यानं चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यांच्या गैरहजरीचे कारण सांगितले. तर कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी देखील अधिक स्पष्टीकरण दिले आहे.

फडणवीस लेह दौऱ्यावर, अजित दादा आजारी
गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस लेह लडाखच्या दौऱ्यावर असल्यानं ते कार्यक्रमाला आले नसल्याचं सांगितलं. तर, अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्यानं ते देखील उपस्थित राहिले नसल्याचं महाजन म्हणाले. मात्र, अजित पवारांचा दौरा जाहीर करुन ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या गटातील नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे नेते अमरावतीमधील कार्यक्रमाला एका कार्यक्रमाला गेले होते.

अजित दादांच्या समर्थक आमदारांचीही दांडी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. विशेष बाब म्हणजे अजित पवार उपस्थित राहिले नसले तरी त्यांचे बुलढाण्यातील समर्थक आमदार देखील या कार्यक्रमाला गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मविआचे कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज रास्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. सकाळी दहाच्या सुमारास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार होते. परंतु, बुलढाणा शहर पोलिसांनी बुलढाण्यातील रास्ता रोको आंदोलन होण्यापूर्वीच नेते आणि कार्यकर्त्यांना रोखले. शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस यांना सकाळी पोलिसांनी घेरून ताब्यात घेतले तर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांना सकाळी पोलिसांनी त्यांच्या घरून पोलिस स्टेशनला आणले. काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेत्यांसह जवळपास पन्नास जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed