मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आतापर्यंत आम्ही बरेच सोसले आहे. आणि या पुढे देखील सोसायचे आहे. मात्र, आता वरतून बॉम्ब जरी टाकला तरी, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे, आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासह 8 जण आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर आणि आंदोलनावर आणखी ठाम झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यभरातील नेते आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले आंदोलन स्थळी पोहोचल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांशी संवाद साधला. या वेळी बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलनाची मागणी पूर्ण होईपर्यंत आता मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार आंदोलनस्थळी दाखल
खासदार उदयनराजे भोसले आंदोलनस्थळी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे आंदोलन स्थळी आगमन झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणानंतर लगेचच शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना येथे पोलिस पाठवण्यात आले असल्याचा आरोप शरद पवार यांनी या वेळी केला आहे.