कालची घटना पाहून मी इथेपर्यंत आलो आहे, काल मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त गावात असल्याचे दिसून आले. बळाचा वापर करण्याची काहीच गरज नव्हती असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तर मी रुग्णालयात जाऊन आलो काही आंदोलकांना छर्रे लागले आहेत, त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे छत्रपती यांनी या आंदोलन स्थळी भेट दिली ही चांगली गोष्ट आहे. जे काही ठरले होते त्यांची अंमलबंजावणी झाली नाही.मी काल सर्व माहिती घेतली, शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. मोठ्या संख्येने पोलिस या ठिकाणी आणले .शरद पवार म्हणाले की, संबंध नसलेल्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला, आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता, तरी मोठ्या संख्येने पोलिस गावात आणले गेले. पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी नव्हे तर तरुणांच्या भविष्यासाठी हे उपोषण सुरू आहे. आंदोलकांना छर्रे लागले आहे. हे मी रुग्णालयात जाऊन पाहून आलो. लोकशाहीमध्ये आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. कुणीही कायदा हातात घेतला नव्हता असे म्हणत जे झाले ते करण्याची गरज नसल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. हे चित्र जालन्यात दिसले आहे. यात पोलिसांना काय दोष द्यायचा. पोलिसांना वरच्या पातळीवरून अशा सूचना आल्या आणि त्यांनी कामगिरी केली.
गृह खात्याची अतिरेकी भूमिका निषेधार्ह
जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबावावे असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.शरद पवार म्हणाले की, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबवले नाही, तर मला त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धीर द्यावा लागेल. तसेच या लोकांची सुटका करण्यासाठी पावले टाकावी लागतील. पोलिसांनी चर्चा केली आणि त्यानंतर लाठीहल्ला केला. हा अमानुष हल्ला आहे, असे स्थानिकांनी सांगितले.शरद पवार म्हणाले की, खरे म्हणजे एकदा चर्चा केल्यानंतर लाठीहल्ला किंवा बळाचा वापर करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र, हल्ली अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कुठलेही प्रश्न असले आणि ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी.