मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत या प्रकरणी बंद व रास्ता रोकोचे हत्यार उपसण्यात आले. अनेक ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.
LIVE UPDATE
- उदयनराजे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधत असताना तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोहोचले. पवार मंचाखाली एका खुर्चीवर बसले. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत त्यांच्या संयमाचे कौतुक केले.
- खासदार उदयनराजे हे जालन्यातील आंतरवाली सराटा गावात आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून त्यांनी आंदोलनाबाबत माहिती जाणून घेतली.
- जालना शहरात शनिवारी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत, अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा केला.
- कन्नड तालुक्यातील औराळा, औराळी, खामगाव, विटा, शेरोडी स कानडगाव, गव्हाली, कविटखेडा, हसनखेडा, सहनगाव, रोहिला, निपानी, जेहुर, आडगाव, तांदुळवाडी, मुगंसापूर, चिवळी, चिंचखेडा, बिपखेडा, जवळी, पळसखेडा या गावातील सकल
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जालन्यातील आंदोलनात पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या ग्रामस्थांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. राज्य सरकार आणि गृह खात्यावर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे काम असते, परंतु गृहमंत्रालयातील प्रशासकांनी पोलिस बळाचा वापर करून मराठा आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केलेला आहे. हि अतिशय संतापजनक बाब आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
- धाराशिवमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. धाराशिव शहरात बंद पुकारूनही काही दुकाने सुरू असल्याचे पाहून आंदोलक महिला संतापल्या. त्यामुळे काही महिला आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे धाराशिवमध्ये सध्या वातावरण तापले आहे.
- मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत. आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
- छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध करत स्वत:चीच कार पेटवून दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गाडी पेटवून देत असतानाच ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे.
- अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात 16 प्रमुख आंदोलकांसह 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा, दंगल भडकवणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.
- जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक लाठीचार्जनंतरही मागे हटले नाहीत. डोक्याला पट्टी बांधून ते आंदोलन करत आहेत. शुक्रवारच्या घटनेमुळे येथे तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलकांनी राज्य शासनाने आरक्षण जाहीर करेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.
- मुंबईत सुरू असलेल्या इंडियाच्या बैठकीवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारने जालन्यात सुनियोजित पद्धतीने मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारला एवढे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न करत मराठी माणसाच्या आक्रोशातून उभे राहणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
- बळाचा गैरवापर करत जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्यात येईल. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच, स्वराज्य संघटनेचे छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील जालन्यात जात पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या ग्रामस्थांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे.
- आज मराठा समाजाकडून जालना, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच, शुक्रवारी रात्री कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर आगारातील बसेसचीही तोडफोड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण
जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्रही लिहिले आहे.
जालन्यात आज रास्ता रोको, बससेवा पूर्ण ठप्प
जालना शहरातील अंबड चौफुलीजवळ आज 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. भूसार मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गेवराई-शेवगाव मार्ग पोलिसांनी बंद केला. छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने शेवगाव मार्गाने वळवण्यात आली. याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेवराई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस डेपोत ठेवल्या असून सोडलेल्या नाहीत. गेवराईतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसेस सध्या बंद आहेत. रस्ता सुरळीत होईल तेव्हा सोडण्यात येतील, असे बीडचे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी सांगितले.
बीड : मराठा समाजातर्फे आज जिल्हा बंद
गेवराईत शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर बीड शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे बैठक झाली व आज शनिवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
संभाजीनगरमध्ये बस पेटवली

छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री 12 वाजता मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर आगाची बस मागून जाळण्यात आली. तर सिडको बसस्थानकात पैठण फलाटावर उभी बस फोडण्यात आली. तसेच, धाराशिव जिल्हा बंदची हाकही आज सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 9 वाजता निषेध नोंदवण्यात येणार आहे.
शरद पवार घेणार आंदोलकांची भेट
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने 20 आंदोलक जखमी झाले.या आंदोलकांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जालना जिल्ह्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक
दरम्यान, जालन्यातील घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाही आता आक्रमक झाला आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराबाबत पुढे काय भूमिका घ्यायची? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा काय? यावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक होत आहे. यासह राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चातर्फे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद होत आहे.