एक फुल आणि दोन हाफला आंदोलकांची भेट घ्यावी वाटली नाही. आंदोलकांवर काल जो शासकीय अत्याचार झाला त्यावर केवळ निषेध करुन होणार नाही. जालन्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा होता म्हणून आंदोलन चिरडण्याचा निर्णय घेतला असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर केला आहे.दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील आंदोलकांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही, कुणाच्या तरी आदेशावरुन आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला असा आरोपही त्यांनी केला आहे. आम्ही काही केले नाही, जे झाले त्यांची सखोल चौकशी करणार असल्याचे हे सरकार सांगेल. इतके खोल जातील की पुन्हा वर येणारच नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना सर्व माहिती दिली जाते, मग यांना कसे माहिती नव्हते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात लोकांची सेवा करणारे पोलिस सरकार बदलताच राक्षस होतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या सर्व गोष्टीच्या मागे कुणी तरी आहे. लाठीचार्ज करण्याचा आदेश कुणी दिला असा सवाल ही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लय भारी, आंदोलनकर्त्यांना त्या कार्यक्रमासाठी मारहाण करण्यात आली. लोकांना घरात घुसून मारण्यात आले असा आरोपही त्यांनी केला आहे. आमचा न्याय हक्कांसाठी आम्ही मागणी करत आहोत. हे हिंदूच्या विरोधातील सरकार असल्याने गणेश उत्सवाच्या काळात अधिवेशन घेत आहे. पोलिस तुमच्या घरी आणि सरकार तुमच्या दारी असे वातावरण सध्या राज्यात सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात सुरू असलेली हुकुमशाही चिरडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भारतमातेचे रक्षण करण्यासाठी आम्ही अगदी मेहबुबा मुफ्ती यांना सुद्धा सोबत घेत आहो. आम्हाला देशात हुकुमशहा जन्माला येऊ देणार नाही. मी तुम्हाला घराणेशाहीबद्दल विचारणा करणारच नाही कारण तुम्हाला घराणेच नाही. जी लोक कुटुंब व्यवस्था नाकारता त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
ठाकरेंचा जालना दौरा
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे देखील जालना येथे जाणार असून, आंदोलकांची भेट घेणार असल्याचे समोर येत आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे जालन्यात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.उद्धव ठाकरे आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर आणि जालनाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची भेट घेतील. तिथून ते अंबडला रवाना होतील. शुक्रवारी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांवर अंबड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी आंदोलकर्त्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहे.