आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली (ता. अंबड) येथे आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी काल (ता.१) अमानूषपणे लाठीहल्ला केला. त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत.विरोधी पक्ष राज्य सरकारवर तुटून पडले आहेत. सत्तेच्या मस्तीतून हा लाठीचार्ज करणाऱ्या मस्तवाल आणि घमेंडिया सरकारची मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, असा हल्लोबोल शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवारांनी कालच लाठीमार झालेल्या अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना भेटी दिल्या. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.स्थानिक नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली.त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जाणवले,असे रोहित यांनी म्हटले आहे.पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिला आहेत का पुरुष आहेत ते बघितले नाही, वयोवृध्द आणि लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील मारले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर केला. ते लागलेल्या युवकांच्या जखमा बघून आपल्याच नागरिकांवर अशाप्रकारे छऱ्यांचा वापर करता येतो का हा प्रश्न पडतो,अशी विचारणाrohit pawar यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर केली.
पुढच्या आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन अमानुषपणे चिरडले असल्याची तसेच वरिष्ठांच्या आदेशानेच एवढी टोकाची भूमिका घेतल्याची भावना भेटीदरम्यान अनेक युवकांनी व्यक्त केली.त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे,असे ते म्हणाले. तसेच शासनाने देखील घटनेकडे गांभीर्याने बघायला हवे,असे टि्वट रोहित यांनी केले आहे.