मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेले राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अदानींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. राहुल म्हणाले की, मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी काँग्रेस मुक्त भारत करण्याची वल्गना केली होती. मात्र जे इंग्रजांना जमलं नाही ते यांना कसं शक्य होईल, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला आहे. टिळक भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी यांनी हे विधान केले.
राहुल गांधी म्हणाले की, अदानी आमचं काही करु शकत नाही. अदानीचा पैसा काँग्रेसला संपवू शकणार नाही. अदानी समूहाचा पैसा भारतातूनपरदेशात गेला व पुन्हा भारतात गुंतवला गेला.
काँग्रेस पक्षात दम नसल्याचं म्हटलं गेलं मग कर्नाटकमध्ये भाजपाला कोणी हरवलं. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली का? कारण हा विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएनए मिळेल.त्यापूर्वी इंडियाच्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. एका माणसासाठी पंतप्रधान काम करत आहेत. पंतप्रधान अदानींच्या चौकशीसाठी दबाव का टाकत नाही. पंतप्रधान आणि भाजप अदानींसोबत आहेत.
इंडियाच्या मंचावर जे नेते आणि वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत,हे सर्वजण देशातल्या ६० टक्के लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आम्ही जर एकत्र निवडणूक लढलो तर भाजपला निवडणूक जिंकणे शक्य नाही. या सर्व पक्षांमध्ये घट्ट संबंध तयार होऊ लागले आहेत. मला वाटतं इंडिया आघाडी भाजपाला आगामी निवडणुकीत हरवेल.