• Tue. Apr 29th, 2025

‘वन नेशन वन इलेक्शन’चे अजितदादांकडून समर्थन:म्हणाले- निवडणुकांमुळे अधिकारी 4, 4 महिने निवांत बसतात

Byjantaadmin

Sep 1, 2023

केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ या प्रस्तावाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. मुंबईत आजही महायुतीची बैठक होत आहे. त्यापूर्वी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.,

आचारसंहितांचा विकासकामांना फटका

अजित पवार म्हणाले, देशात एकाच वेळी निवडणूक होणे गरजेचे आहे. वारंवार निवडणुका झाल्यास त्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अधिकारी चार-चार महिने केवळ निवांत बसून असतात. आम्हीही काहीही आदेश दिले तर सरळ सांगतात सध्या आचारसंहिता आहे. त्यामुळे काम करू शकत नाही. विकासाच्या कामांना मान्यता देता येत नाही. आचारसंहितेमुळे कोणत्याही कामाला प्रशासकीय मान्यता देता येत नाही.

वारंवार निवडणुका अडचणीच्या

अजित पवार म्हणाले,आपल्या देशाला सारख्या सारख्या निवडणुका विकासाच्या दृष्टीने अडचणीच्या ठरतात. कोणत्याही सरकारला किंवा लोकप्रतिनिधीचे महत्त्वाचे काम म्हणजे विकास करणे आहे. सरकारला योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायच्या असतात. परंतू चार चार महिने हे काम ठप्प असते. देशाला विकासाच्या दृष्टीने हे परवडणारे नाही.

अधिकारीही निवडणुकीला जुंपले जातात

अजित पवार म्हणाले, देशात एकच मोठी निवडणूक झठाली तर ती देशाच्या हिताची आहे. आपल्या देशात विधानसभा निवडणुकीमुळे चार महिने तर लोकसभा निवडणुकीमुळे चार महिने असे आठ महिने विकासाला खीळ बसते. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो अधिकाऱ्यांचा. समजा महाराष्ट्रात निवडणुका नसल्या, त्या छत्तीसगड किंवा अन्य कोणत्याही राज्यात असल्या तरी आपले आयएएस अधिकाऱ्यांची रवानगी तिकडे होते. हे अधिकारी एक-दोन महिने तिकडेच असतात. त्यामुळे पुन्हा विकासाला खीळ बसते.

मोदी पुण्यातून निवडणूक लढवतील

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणुकीला उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे लोकसभा मतदार संघावून निवडणूक लढवावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते संजय काकडे यांनीच मोदींना एक पत्र लिहिले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मोदींच्या केवळ नावावर देशातील 300 खासदार निवडून आले आहेत. मोदींनी कुठूनही निवडणूक लढवली तरी ते जिंकतील. मात्र, कुठून उभे राहायचे याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा व त्यांच्या पक्षाचा आहे. याबाबत मी जास्त बोलू इच्छित नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed