कमी पडलेला पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी याचा फटका आता राज्याला बसणार असून राज्यावर लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा फटका बसणार असून मागणी वाढल्याने आणि तुटवडा निर्माण झाल्याने इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आता रोज अर्धा तास ते दोन तासांच्या लोडशेडिंगला सामोरं जावं लागणार आहे.
राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याचं दिसून आलं. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा वाढला आहे. याचा परिणाम हा विजेचा तुटवडा निर्माण होण्यावर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे. विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा लोडशेडिंग करण्यात येत आहे. कधी अर्धा तास, कधी एक तास तर कधी दीड तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडल्यास आल्यास लोडशेडिंग आपोआप बंद होईल असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.