• Mon. Apr 28th, 2025

गुवाहाटी, सुरतचा खर्च कोणी केला? बीकेसीचा खर्च कुणाचा?; सुषमा अंधारे यांनी घेरले

Byjantaadmin

Sep 1, 2023

मुंबईत ग्रँड हयात हॉटेलमध्ये india  बैठक सुरू आहे. कालपासून ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी ग्रँड हयात हॉटेलचे आणि आजूबाजूच्या हॉटेल्सचे रुम बूक करण्यात आले आहेत. तसेच पाहुण्यांसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे निर्णय होणार आहेत. मात्र, या बैठकीवरून शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. या बैठकीचा खर्च कुठून करण्यात आला? कुणी पैसा दिला? असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे. तर, सामंत यांच्या या उत्तरावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करारा जवाब दिला आहे.

गुवाहाटी, सुरतचा खर्च कोणी केला? बीकेसीचा खर्च कुणाचा?; सुषमा अंधारे यांनी घेरले

 

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे. दावोसला जाण्याचा खर्च कुणी केला? तुमच्यासोबत दुसरा व्यक्ती कोण होता? बीकेसीतील 10 कोटींचा खर्च कुणी केला? आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार? असा सवाल करतानाच ठाकरेंना खर्च विचारायची तुमची छाती नाही. कारण तुम्हाला ठाकरेंनीच मोठं केलं आहे, असा चिमटाही सुषमा अंधारे यांनी काढला.

मग पुरावे द्या

गुवाहाटीचा खर्च आपण केल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्याकडे सुषमा अंधारे यांचं लक्ष वेधलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चांगली गोष्ट आहे. जर त्यांनी गुवाहाटीचा खर्च केला असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत, अशी मागणी करतानाच एवढं अंगावर घेतलं तरी तुमचे मंत्रिपदासाठी नाव नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मणिपूरसाठी अधिवेशन का नाही?

इंडिया आघाडीची बैठक होत असल्याने अनेकांना अॅलर्जी झाली आहे. त्यामुळे महायुतीची बैठक मुंबईत घेतली जात आहे, असं त्या म्हणाल्या. संसदेच्या विशेष अधिवेशनावरूनही त्यांनी टीका केली. मणिपूरसाठी विशेष अधिवेशन का बोलावलं नाही? फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व काही केलं जात आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

तुमच्याकडे एकच चेहरा

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे. रावणाबाबत बोलताना विचार करा. रावणाकडे नितीमत्ता होती, असा टोला त्यांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणवीसजी आमच्याकडे पंतप्रधान पदाचे बरेच पर्याय आहेत. पण तुमच्याकडे एकच चेहरा आहे. किती वर्ष झाले तुमच्याकडे तोच तो चेहरा आहे. त्यावर आधी बोला, अशी टीका त्यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed