महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा चांगलाच गाजला होता. आता या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात एकूण 14 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आरोप पत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नीचे नाव वगळण्यात आले आहे. या विषयीची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एका नेत्याचे नाव देखील असल्याचे सांगण्यात आले आहे.
दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात शरद पवार गटामध्ये असलेले प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या भावाच्या नावाचा समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नावाचाही यात समावेश करण्यात आला आहे.
ईडीची प्रतिक्रिया नाही
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. आणखी कोणी आरोपी आढळल्यास पुन्हा पुरवणी आरोपपत्राद्वारे नावाचा समावेश केला जाऊ शकतो, असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मूळ ठपका काय?
ईडीच्या वतीने दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण 14 नावांचा समावेश आहे. यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांच्या नावांना वगळण्यात आले आहे. तर सुभाष देशमुख, रणजीत देशमुख इत्यादी मोठी नावे यादीमध्ये सामाविष्ट करण्यात आली आहेत. कारखाने कमी पैशात खरेदी करणे आणि विक्री प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे न राबवणे हा मूळ ठपका ईडीने या प्रकरणात ठेवला होता. याप्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नेमका शिखर बँक घोटाळा काय?
या प्रकरणात ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेही चांगलेच अडचणीत आले होते. 2010 मध्ये शिखर बँकने राम गणेश गडकरी साखर कारखाना विकला होता. साखर कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी 32 लाख रुपये होती. असे असताना देखील हा कारखाना अवघ्या 12 कोटी 95 लाखांना विकण्यात आला होता. त्यामुळे या विक्री प्रकरणात अपेक्षित प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यावेळी बँकेच्या संचालक पदी अजित पवार होते. यात ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला होता.
यादीमध्ये अनेक महत्त्वाची नावे
प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजीत देशमुख, प्रसाद सागर, अलाईड अॅग्रो प्रोडक्ट, तक्षशिला सिक्युरिटीज, समीर मुळे, अर्जुन खोतकर यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.