मागच्या १ महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळ्यात पाणी देऊ पिकं जगविण्याची आणि त्यात पुन्हा उच्च दाबाने व अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने उभी पिकं डोळ्यांदेखत जळताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकरी बांधवांवर ओढवली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील सरपंच व महावितरणचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेतली. या बैठकीतून आमदार पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच फोन लावला. तर फडणवीसांनी देखील थेट इशारा देत, शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आदेश दिले.
या संदर्भात माहिती देताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, उच्च दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्यासंदर्भात तसेच बिघडलेले डीपी वेळेवर दुरुस्त करून देण्यासंदर्भात काहीजण फक्त कारणे देण्याची भूमिका घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर बैठकीतूनच उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधून शेतकऱ्यांचे गार्हाणे त्यांच्याकडे मांडले. उपमुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा कारभार जर कोणी करत असेल तर त्याला घरी बसविण्यात येईल” असा सज्जड दम देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलपणे मार्गी लावण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.’या बैठकीला मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, निलंगा येथील अभियंता जाधव, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, सरपंच, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.