भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी नेमलेल्या आयोगाने प्रकाश आंबेडकर यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात काय सांगितलं याची माहिती स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना दिली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला. “अनेकांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची माहिती दाबून ठेवली आहे,” असा आरोपही केला. ते बुधवारी (३० ऑगस्ट) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले, “देवेंद्र फडणवीस १ जानेवारीला भीमा कोरेगावपासून ४० किलोमीटरवर नगर जिल्ह्यात होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने ११.३० ते ११.४० वाजता टेक ऑफ केल्याची नोंद आहे. दंगल सकाळी झाली. त्यांना या दंगलीविषयी माहिती असतं तर त्यांनी पुण्याला येऊन दंगलीचा आढावा घेतला असता. मात्र, त्यांना दंगलीची माहिती मिळालीच नाही. त्यामुळे हे प्रशासकीय स्तरावरचं अपयश आहे की राजकीय अपयश आहे याची आयोगाने चौकशी करावी.”
“अनेकांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची माहिती दाबून ठेवली”
“अनेकांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाची माहिती दाबून ठेवली आहे. त्याबाबत मी आयोगाला पुढील सुनावणीत दोन घटना सांगणार आहे. MUMBAI सारख्या बॉम्बस्फोटातही सगळी माहिती मिळालेली असताना ती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहचली नाही नाही म्हणून ते त्याविरोधात कारवाई करू शकले नाहीत आणि २६/११ ची घटना घडली,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
“सुनावणीत माझ्या जबाबानंतर प्रश्नही विचारण्यात आले”
“पुन्हा पुन्हा अशा घटना होत आहेत. त्यामुळे यात जबाबदारी निश्चित करण्याचं काम आयोगाने करावं. सुनावणीत माझ्या जबाबानंतर प्रश्नही विचारण्यात आले. मी त्या प्रश्नांची उत्तरं आयोगाला दिलेली आहेत. संभाजी महाराजांचं दफन कुणी केलं या वादातून उलटतपासणी झाली. आता नवं राजकीय समीकरण तयार होत आहे. सरंजामशाही मराठ्यांची आणि ब्राह्मणशाहीची नव्याने युती होत आहे,” असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.