• Mon. Apr 28th, 2025

पंकजा मुंडेच्या ‘शिवशक्ती’ यात्रेला सुरुवात

Byjantaadmin

Aug 30, 2023

राजकारणाचा कंटाळा आल्याने दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेणाऱ्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. मात्र, या वेळी त्यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढत धार्मिक स्थळांना भेटी देण्याची तयारी केली आहे. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी पंकजा मुंडे यांनी श्री क्षेत्र माहुर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले. या दरम्यान त्या नांदेड विमानतळावरुन माहुरला रस्ते मार्गाने पोहोचल्या. मार्गात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष राजकीय घडमोडींमध्ये सहभागी न होता, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून लोकांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यभरात अकरा दिवसांच्या या दौऱ्यात त्या दहा जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत टाकल्याची भावना पंकजा मुंडे यांच्या मनात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली होती. आपण या संदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तरी देखील भाजपमध्ये कोणतीच हालचाल न झाल्याने अखेर दोन महिन्यांचा ब्रेक घेत त्यांनी चर्चा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.आता मात्र, शिवशक्ती यात्रेच्या माध्यमातून आपण जनतेच्या संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात नागरिकांना मला भेटण्यासाठी यावे, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले होते. त्या प्रमाणे त्यांनी रस्ते मार्गाने जाताना नागरिकांच्या भेटी घेतल्या.

शिवशक्ती असे नाव का?

पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी काढण्यात येत आहे. त्याच बरोबर शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेचेही दर्शन या दौऱ्यात पंकजा मुंडे घेणार आहेत. त्यामुळे हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जाते. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.

राजकारणात सक्रिय होणार?

भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी माहुर येथील श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. मात्र, हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ब्रेकवरुन परतलेल्या पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed