छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असे भाषण केल्या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी देखील राज्यभरात कालिचरण महाराजांविरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सिंहगड रोज परिसरातील सनसिटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कालिचरण महाराज यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, असे भाषण केले. या प्रकरणी पोलिस हवालदार नितीन खुटवड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ध्वनिचित्रफीत पडताळणीनंतर कारवाई
या प्ररकणी कालिचरण महाराज यांनी केलेल्या भाषणाची ध्वनिचित्रफीत पोलिसांनी तपासून पाहिली आहे. त्या नंतरच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कादबाने या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
फक्त आठवी पर्यंतच झाले शिक्षण
कालीचरण महाराज हे महाराष्ट्रातील अकोल्यातील शिवाजीनगर या भागात राहतात. कालीचरण यांचे खरे नाव अभिजीत धनंजय सराग असे असुन ते भावसार समाजाचे आहेत. एका साधारण कुंटुंबात जन्मलेल्या अभिजीत सराग यांचे वडिल धनंजय सराग यांचे अकोल्यातील जयन चौक या परिसरात एक मेडिकल शॉप होते. 48 वर्षीय कालीचरण महाराज यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. विशेष म्हणजे महाराजांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे. त्यांच्या नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी शालेय शिक्षण कमी घेतले असले तरीही त्यांनी धार्मिक शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले आहे.
मराठीसह हिंदीवर देखील चागंले प्रभूत्व
कालीचरण महाराज यांचे कुंटुंब गरीब असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना इंदूर येथे आपल्या मावशीकडे पाठवले होते. त्यामुळे महाराजांचे मराठी सोबतच हिंदीवर देखील चांगले प्रभूत्व आहे.
इंदूरमध्ये अनेक वर्ष भय्यूजी महाराजांसोबत राहिले
इंदूरमध्ये असल्याकारणाने कालीचरण महाराज हे भय्यूजी महाराज यांच्या आश्रमामध्ये जायचे, जेणेकरुन कालीचरण आणि भय्यूजी महाराज यांच्यात चागंली मैत्री झाली. या आश्रमातून कालीचरण यांनी महाराज ही उपमा मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले.
कालीचरण महाराज आपल्या कपाळावर नेहमी लाल ठिपका लावतात. कालीचरण महाराज नेहमी आपले केस उघडे ठेवतात आणि कपाळावर एक मोठा लाल ठिपका ठेवतात. ते सहसा लाल रंगाचे कपडे घालतात. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक पेजेस तयार करण्यात आली असून त्यांचे लाखो फॉलोअर्स देखील आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात महाराज
कालीचरण महाराजांनी 2017 साली अकोलामध्ये नगरपालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महाराजांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाराजांनी पुन्हा 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवली नाही.