भाजपविरोधी इंडिया आघाडीची उद्या मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पाटणा व बंगळुरूनंतर इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असून या बैठकीत लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम ठरवला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे.
सांताक्रुझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी विरोधी पक्षातील नेते मुंबईत येण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी (ता. 29) राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे मुंबईत आगमन झाले. तर, आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीला देशातील 26 पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विमानतळावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. तसेच, त्यांच्या जेवणातही अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. 31 ऑगस्ट रोजी बैठकीच्या पहिल्या दिवशी आघाडीतील पक्षांच्या नेत्यांचे मुंबईत आगमन होईल. त्या दिवशी ग्रॅण्ड हयातमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. देशपातळीवरील नेते येणार असले तरी त्यांच्या ताटात महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक पदार्थांचा समावेश असणार आहे.

मविआची आज संयुक्त पत्रकार परिषद
इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि नाना पटोले या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. बैठकीचा दोन दिवसांचा कार्यक्रम कशा पद्धतीने असेल याबाबत ते माहिती देणार आहेत.
शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टीही सामील
इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जनता दल (संयुक्त), राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांच्यासह देशभरातील भाजप विरोधी 26 पक्षांचे प्रमुख नेते हजर असणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील 13 छोटे पक्ष आणि संघटनांचा प्रागतिक विकास मंचही इंडिया आघाडीत सामील होणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
लोगोचे अनावरण, प्रचारसभांचे धोरण ठरणार
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे. या बैठकीदरम्यानच इंडियाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. आघाडीचा भविष्यातील संयुक्त कार्यक्रमही ठरवला जाणार आहे. येत्या काळात आघाडीच्या संयुक्त प्रचारसभा देशभरात घेतल्या जाणार आहेत. त्या कशा पद्धतीने आणि कुठे घ्यायच्या याचे धोरण या बैठकीत आखले जाणार आहे.
नेर्तृत्व कोणाकडे, राज्यांतील धोरण कसे ठरवणार?
इंडिया आघाडीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पक्ष आणि जनता दल (संयुक्त) असे मोठे पक्ष सहभागी झाले आहेत. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असणार, हे अद्याप स्पष्ट नाही. शिवाय, एकमेकांना विविध ठिकाणी विरोध करणारे किंवा काही मुद्यांवर असहमत असलेले पक्षही यामध्ये आहेत. दिल्लीत आप विरूद्ध काँग्रेसमध्येच संघर्ष पेटण्याची स्थिती आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये डावे विरुद्ध तृणमूल विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. केरळमध्येही काँग्रेस विरुद्ध डावे अशी लढत आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर बैठकीत काही धोरण ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मायावती बसपा लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार:कोणाशीही युती नाही; इंडिया आघाडीच्या बैठकीआधी घोषणा

या वर्षी होणार्या 5 राज्यांच्या विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (BSP) एकट्याने लढणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी बुधवारी ही घोषणा केली. मुंबईतील बैठकीपूर्वी विरोधकांनी मायावती यांच्याशी नव्या महाआघाडीत सामील होण्यासाठी संपर्क साधल्याची चर्चा होती. मुंबईतील विरोधी आघाडीच्या बैठकीच्या एक दिवस आधी मायावती म्हणाल्या- NDA आणि INDIA युती हे बहुतांशी गरीबविरोधी, जातीयवादी, धनिकांचे समर्थक आणि भांडवलदार धोरणे असलेले पक्ष आहेत. ज्यांच्या धोरणांविरोधात बसपा लढत आहे. त्यामुळेच त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.