लातूरची विमानसेवा लवकर सुरू होणार !
जमिनीचे अधिग्रहण करून विमानतळाची उर्वरित कामे त्वरित पूर्ण करणार उद्योग मंत्री उदय सामंत यांचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना आश्वासन
तिसऱ्या टप्प्यातील एमआयडीसी विस्तारासाठी जमिनीचे अधिग्रहण करावे
परतीच्या मान्सून नंतरच पाणी कपाती बाबतचा निर्णय
कमी पाणी लागणाऱ्या उद्योगांना लातूर, उस्मानाबाद बीड जिल्ह्यात प्राधान्य द्यावे
एमआयडीसी अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी निधी द्यावा
लातूर (प्रतिनिधी): लातूरच्या औद्योगिक, शैक्षणिक, कृषी विकासासाठी असलेली लातूरची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची परवानगी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करून विमानतळावरील उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना दिले.
लातूर एमआयडीसी विस्तारासाठी जमिनीचे अधिग्रहण, एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, उद्योगांसाठी पाणीपुरवठा त्याचबरोबर लातूर विमानतळावरील विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
लातूर जिल्हा महाराष्ट्रातील एक शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून अत्यंत गतीने विकसित होत आहे. येथील कृषी मालाची बाजारपेठ राज्यातील एक नामवंत बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे या शहराच्या आणि जिल्ह्याच्या एकूण विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी येथील विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. लातूरच्या विमानतळावरील विमानसेवेला एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया ची पुन्हा परवानगी मिळण्यासाठी या विमानतळाच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. नऊ हेक्टर जमिनीचे अधिकरण केल्यानंतरच या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होणार आहेत्यामुळे सदरील जमिनीचे अधिग्रहण सक्तीने करण्यात यावे अशी मागणी आज आमदार अमित देशमुख यांनी केली असता उद्योग मंत्री या जमीन अधिग्रहणास मंजुरी देत विमानतळावरील उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले, तिसऱ्या टप्प्यातील एमआयडीसी विस्तारासाठी जमिनीचे अधिग्रहण नवीन उद्योग उभारणीसाठी जागेची उपलब्धता व्हावी म्हणून लातूर एमआयडीसी च्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी चाटा, भोयरा परिसरातील जमिनीचे आवश्यकतेनुसार अधिग्रहण करण्यात येईल असे आश्वासनही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.
परतीच्या मान्सून नंतरच पाणी कपाती बाबतचा निर्णय
पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे, असे असले तरी लातूर व परिसरात परतीच्या मान्सूनचा पाऊस चांगला पडतो असा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे लातूर एमआयडीसीतील उद्योगांचा पाणीपुरवठ्याची कपातकरण्यापूर्वी परतीच्या मान्सूनची वाट पहावी अशी विनंती आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे केली या मागणीलाही त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला,
कमी पाणी लागणाऱ्या उद्योगांना लातूर एमआयडीसीत प्राधान्य द्यावे
लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी येथे नवनवीन उद्योग उभारणीला चालना देणे आवश्यक आहे, येथील नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता लातूर , उस्मानाबाद बीड या या जिल्ह्यांमध्ये कमी पाण्यावर चालणारे उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन द्यावे, वैद्यकीय क्षेत्रात लागणारी मशनरी व अवजारे तयार करणारी कारखानदारी येथे प्राधान्याने उभारण्यात यावी अशी मागणी आमदार देशमुख यांनी केले असता उद्योगमंत्री सामंत यांनी या संकल्पनेचे स्वागत केले,
रस्ते दुरुस्तीसाठी निधी द्यावा
. लातूर एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे त्यामुळे या रस्त्यांचे दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे त्यासाठी आवश्यक
असणारा निधी मंजूर करावा अशी विनंती आमदार देशमुख यांनी उद्योग मंत्री सामंत यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे,
उद्योग वाढीसाठी सकारात्मक चर्चा
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली चर्चा खूपच सकारात्मकराहिली, त्यांनी लातूरसह उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातील औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी म्हंटले आहे.