• Tue. Apr 29th, 2025

सना खान हत्याकांडाबाबत भाजपचे मौन? फेसबुकवरील छायाचित्रांतून दांडगा जनसंपर्क समोर

Byjantaadmin

Aug 30, 2023

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांच्या हत्याकांडाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत एकाही भाजप नेत्याने सना यांना श्रद्धांजली वाहिली नाही किंवा सना यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलीस आयुक्तांना साधे निवेदनही दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

BJP, silence, Sana Khan murder, nagpur, police

 

सना खान या भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या आणि मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात होत्या. त्यांच्या फेसबुकवर अनेकांची छायाचित्रे आजही झळकत आहेत. मात्र, यातला कुणीही या विषयावर एक शब्दही न बोलल्याने या हत्याकांडाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सना यांनी पूर्वी भाजपच्या युवा मोर्चातसुद्धा काम केले आहे. विद्यार्थी जीवनापासूनच सना भाजपमध्ये सक्रिय होत्या.त्यांनी करोना काळात अन्नदान, धान्य किट वाटप आणि रक्तदान कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे सना या जरीपटका परिसरात दीदी नावाने परिचित होत्या. सना यांच्या याच कामाची दखल भाजप श्रेष्ठींनी घेतली होती. सना अल्पावधीतच भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात आल्या. सना यांना महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील नेतेही कार्यक्रमांना बोलवायला लागले.वतृत्वशैलीमुळे सना भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत सभा घ्यायला लागल्या. काही नेत्यांनी सना यांच्या कार्यशैलीचा आपल्या प्रचारासाठी किंवा स्वच्छ प्रतिमा निर्माण करण्यासाठी वापर करून घेतला. सामाजिक कार्याच्या चित्रफिती बनवण्याची आणि छायाचित्र काढण्याची सवय असलेल्या सना यांनी भाजपच्या अनेक नेत्यांसोबतच्या उपक्रमांना चित्रबद्ध केले. ते फेसबुकवर प्रसिद्ध केले. त्यात भाजपच्या nagpur शहराध्यक्षांपासून ते युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची छायाचित्रे आहेत. तसेच भाजपच्या काही जेष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांसोबतही सना यांची छायाचित्रे आहेत.

सना खान या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. परंतु, या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप होऊ नये, या हेतूने आणि पोलीस निष्पक्ष तपास करीत असल्याने आतापर्यंत भाजपच्यावतीने कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. आमच्या पूर्ण संवेदना सना खान यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल आणि खान कुटुंबीयांना न्याय मिळेल. – चंदन गोस्वामी, प्रवक्ते,भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed