राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशा तिन पक्षांचे सरकार आहे. या तिघांमध्ये कामाचे वाटप आणि जबाबदाऱ्या निश्चित असल्या तरी अजित पवार मुख्यमंत्री आणि इतरही मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला आहे.अजित पवार यांनी साखर कारखान्यांबाबत काढलेल्या शासन निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांनी मागे घेतले आहे. भाजपच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.सत्तेत सामिल झाल्यानंतर नवीन शासन निर्णय काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखानदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता भाजपच्या दबावामुळे अजित दादांचा हा निर्णय आठ दिवसातच मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजेच एनसीडीसी मंजूर केलेले 549.54 कोटी रुपयांचे कर्ज हवे असेल तर कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे आणि कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा, तसेच गहाणखत आणि अन्य दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्याच्या नव्या अटी लादण्यात आल्या होत्या.या संबंधिचा शासन आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून काढण्यात आला होता. मात्र, याचा फटका भाजप नेत्यांच्या कारखान्यांना बसणार होता. अखेर भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कोणकोणत्या भाजप नेत्यांच्या कारखाने
- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना 113.42 कोटी – माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील
- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना 150 कोटी आणि निरा-भीमा सहकारी साखर कारखाना 75 कोटी – दोन्ही कारखाने माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित
- लातूर जिल्ह्यातील किल्लारी औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना 50 कोटी – भाजप आमदार अभिमन्यू पवार
- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना 34.74 कोटी – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित
- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना 126.38 कोटी – भाजप खासदार मुन्ना महाडिक