पुणे आणि नागपूरच्या यांच्यात ठाणे कुठेच दिसत नाही. कारण दोघेही टेरर आहेत. मात्र, पुण्यातील अजितदादांवर नागपूरचे देवेंद्रभाऊ वरचढ होत असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. साखर कारखान्यांबाबत राज्य सरकारने जीआर मागे घेतला आहे. हा निर्णय म्हणजे अजित पवार यांना फडणवीस यांनी दिलेला धक्का मानला जातोय. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.राज्यातील सरकारमध्ये सर्व आलबेल आहे, असे आम्हाला वाटले होते. मात्र, सर्व काही आलबेल नाही. एक इंजिन दुसऱ्या इंजिनला धकड देताना दिसत असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये इतक्या लवकर मतभेत होतील, असे आम्हालाही वाटले नव्हते. मात्र, सरकारमध्ये टोकाचे मतभेत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकेल, असे वाटत नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेच दिसून येत नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.आपआपसातील मारामाऱ्या आणि आपआपले माणसे पोसण्यासाठी हे सरकार स्थापन करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
राज्यातील जनतेच्या तिजोरीची लूट
साखर कारखान्यांच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची लूट होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आमच्या सरकारच्या काळात असे निर्णय झाले, तेव्हा आम्ही तिजोरी खाली करत असल्याचा आरोप भाजपने केला होता. आता मात्र, तीच भाजप जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.