• Tue. Apr 29th, 2025

विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थांपासून दूर राहून करिअरवर लक्ष द्या ! जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन

Byjantaadmin

Aug 30, 2023

विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थांपासून दूर राहून करिअरवर लक्ष द्या !

  • जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन
  • औषध विक्रेत्यांनी ‘नो मेडिसिन, विदाउट प्रिस्क्रिप्शन’चे पालन करावे
  • औषध विक्री दुकानांची तपासणी करण्यासाठी भरारी पथके नेमणार

लातूर, (जिमाका): ‘एज्युकेशन हब’ अशी लातूरची ओळख असून राज्यभरातून विद्यार्थी या शहरात शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ, नशा येणाऱ्या औषधांपासून दूर राहून आपल्या जीवनातील ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. आज झालेल्या अंमली पदार्थविरोधी समितीच्या बैठकीनंतर त्यांनी हे आवाहन केले.

औषध विक्रेत्यांनी ‘नो मेडिसिन, विदाऊट प्रिस्क्रिप्शन’ तत्वाचे पालन करावे. कोणालाही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विक्री करू नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच नियमाची कठोर अंमलबजावणी होण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लातूर येथील कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्यासाठी पालक आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शहरामध्ये ठेवतात. त्यामुळे कोचिंग क्लासचे संचालक, तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी पालकत्वाची भूमिका घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगून त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याच्या सूचना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.

सर्व माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये परिपाठानंतर नियमितपणे विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करून त्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देण्याबाबत शिक्षण विभागाने सूचना द्याव्यात. तसेच धाब्यावर तसेच इतर अवैध दारू विक्री बंद करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची गय करणार नाही- पोलीस अधीक्षक सोमय मुंडे

लातूर शहरात 28 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची, तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात अंमली पदार्थ, नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री होवू नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. अशाप्रकारे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच प्रिस्क्रिप्शन नसतानाही औषधांची विक्री करताना आढळणारे औषध विक्रेते, मेडिकल रिप्रेझेंटेटिवज् आणि वितरक पोलीस तपासात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई कली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed