विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी धनंजय गुडसूरकर शिरूर अनंतपाळ मध्ये होणार तिसरे संमेलन
शिरूर अनंतपाळ (वार्ताहर)येथील साहित्य संस्कृती संवर्धन मंडळ व श्री अनंतपाळ नूतन विद्यालय शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या विभागीय साहित्य संमेलनाच
या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे संयोजन समितीच्या झालेल्या बैठकीत श्री गुडसूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.शिरूर अनंतपाळ येथील साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने यापूर्वी दोन साहित्य संमेलने झाली असून प्रा . भास्कर चंदनशिव व प्राचार्य ग.पी. मनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही संमेलने संस्मरणीय ठरली आहेत .तिसरे साहित्य संमेलन दि. ९ सप्टेंबर रोज शनिवारी रोजी शिरूर अनंतपाळ येथे पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले धनंजय गुडसूरकर हे नामांकित लेखक असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध असून सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या गुडसूरकर यांचा बालसाहित्य, ललित लेखन, समीक्षा लेखन या प्रांतात वावर आहे. श्रमर्षी बाबा आमटे यांच्या कार्यावर १२५ व्याख्याने देणाऱ्या गुडसूरकर यांचे साहित्य चळवळीत मोठे योगदान आहे. उदगीर येथील प्रबोधन साहित्य परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून ३० वर्षात त्यांनी साहित्यिक उपक्रम राबविले असून शिक्षक विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. कथाकथन, एकपात्री प्रयोग यामधून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे कार्यवाह राहिलेल्या गुडसूरकर यांचे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात ही योगदान राहिले आहे . महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते सदस्य आहेत. माहूर येथे पार पडलेल्या पहिल्या विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत .
श्री अनंतपाळ नूतन विद्यालय शिक्षण समितीचे अध्यक्ष नामदेवराव जगताप, सचिव प्रभाकरराव कुलकर्णी, साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे, सचिव शिवाजी मादलापूरे यांच्या सह संयोजन समितीच्या बैठकीत गुडसूरकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात . साहित्य संमेलनाच्या संदर्भाने जोरदार तयारी सुरु असून लवकरच सर्व तपशील दिला जाईल असे संयोजकांनी सांगितले.