अपेक्षित पाऊस न पडल्याने पाणीपुरवठ्याच्या रोटेशनमध्ये बदल
लातूर/प्रतिनिधी: यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही अपेक्षित पाऊस न पडल्याने लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याच्या रोटेशन मध्ये बदल करण्यात आला आहे.
लातूर शहराला आतापर्यंत चार दिवसाला पाणीपुरवठा केला जात होता.परंतू यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरीही अपेक्षित पाऊस झाला नाही.त्यामुळे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पुरेसा पाणी साठा झाला नाही. प्रकल्पात असणारा साठा लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे रोटेशन बदलण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.त्यामुळे आता चार दिवसांऐवजी पाच दिवसाला शहरात पाणीपुरवठा केला जाईल. कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यामुळे पाणीसाठा वाढलेला नसल्याने ही उपाययोजना करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. नागरिकांनी आपल्या नळांना तोट्या बसवून घ्याव्यात.उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे.गाड्या धुणे व त्यासारख्या कामांसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर करू नये.पाण्याचा अपव्यय टाळावा,असे आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.