कृषी पंपाचा विद्युत पुरवठा रात्री ऐवजी दिवसा करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन- प्रा. मिरगाळे
निलंगा: तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतातील कृषी पंपासाठी डिमांड भरून गेली दोन ते तीन वर्ष झाले असताना सुद्धा आजतागायात विज जोडणी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या विहिरीला व बोअरला पाणी लागून दोन वर्षे झाली असताना, विहिरीत पाणी असताना सुद्धा पिके हे डोळ्यासमोर वाळून जात आहेत. लाखो रुपये खर्च करून विंधन विहिरी पाडून, पाणी असताना सुद्धा त्या पाण्याचा जर वीज जोडणी अभावी वापर होत नसेल तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीतर काय करणार. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण आहे. ज्या शेतकऱ्यांचे दोन वर्षापासून वीज जोडणी करण्यात आलेले नाही त्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी करून देण्यात यावी. भारत हा कृषीप्रधान देश आहे असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात पाहिले असता जगाच्या पोशिंद्यालाच रात्री अपरात्री शेतीत फिरून पाणी देऊन अन्नधान्य पीकवावे लागते ही शोकांतिका आहे. ज्या शेतकऱ्यांना कृषी पंपाची विद्युत जोडणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा तात्काळ विद्युत पुरवठा करावा. अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी महावितरणला दिला आहे.
कृषी पंपाचा विद्युत पुरवठा रात्री ऐवजी दिवसा करून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन
