आज१ ४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन
आजच्या दिना निमित्ताने जाणून घेऊया मधुमेह बाबत माहिती !
मधुमेहचे लक्षणे:
मधुमेहामुळे अंधुक दिसणे, डोळे दुखणे, जड पडणे अशा दृष्टीशी आणि डोळ्यांशी निगडित तक्रारी असतात. संधिवात, किडनीवर परिणाम होतो म्हणजेच मधुमेहामुळे कमीत कमी शरीरातील १४ अवयवांवर विपरीत परिणाम होतो. जागतिक क्रमवारीत मधुमेहींची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
*प्रतिबंधात्मक उपाय* :
मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञांची भेट घ्यावी आणि ठरल्या वेळी भेटीस जाणे चुकवू नये. धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वरखाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे अशाप्रकारची डीएमईची कोणत्याही लक्षणांचे सजगपणे निरीक्षण करावे आणि दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तत्काळ तज्ज्ञांची भेट घ्यावी. डॉक्टरांनी दिलेला सल्ला आणि उपचारांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे. मधुमेहाचे व्यवस्थापन परिणामकारकरित्या करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत रहावे. तुम्ही धूम्रपान करत असाल तर त्यात खंड पडावा यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ते सोडण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत. वजन नियंत्रणात ठेवावे आणि समतोल आहार घ्यावा. नियमितपणे व्यायाम करावा व रक्तदाब किंवा कॉलेस्ट्रोलचे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
*आहार काय असावा ?*
* साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट पूर्ण बंद करावे.
* फास्ट फूड, कोल्डड्रिंक्स, शिळे अन्नपदार्थ टाळावे.
* तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ बंद करावे. दूध, साय, लोणी, नारळ, अंडी, पामतेल, शुद्ध तूपही यांमुळे हृदयरोगालाही आमंत्रण मिळते.
* मोनो अनसॅचुरेटेड नावाची चरबी शेंगदाणा, मोहरी, तीळ यांपासून बनलेल्या तेलात आणि फिश ऑइल यामध्ये जास्त असते आणि यांचे सेवन फायदेशीर असते. जवस, अक्रोड, बदाम, मासे, बीन्सही फायदेशीर असते.
* ट्रान्स फॅटी अॅसिड्स घातक असतात. वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी यामध्ये यांचे प्रमाण जास्त असते.
* मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे हे पदार्थ बंद करावे.
* आंबा, केळी, चिक्कू, द्राक्ष ही फळे बंद करावीत.
* पालेभाज्या, कोबी, गवार, दोडके, कारले, शेवगा या भाज्या खाव्यात.
* मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी, काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो हे जास्त प्रमाणात घ्यावे.
* टरबूज, पपई, बोर, पेरू, जांभळे, सफरचंद, करवंदे इत्यादी फळे घ्यावीत. रोज एक फळ खाणे रोग्यासाठी चांगले असते.
* तंतुमय पदार्थांचे सेवन करावे जसे रागी, बाजारी, मका, गहू इत्यादी.
* द्रव पदार्थ उदा. लिंबूपाणी, फळांचा रस, भाज्यांचा रस, सूप इत्यादी घ्यावेत.
* मधुमेहाच्या रुग्णाने उपवास टाळावेत. रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धवस्था येण्याची शक्यता असते. प्रवास करतानाही जेवणाच्या वेळा पाळाव्यात.
*मधुमेही व्यक्तींसाठी व्यायाम* :
मधुमेहींसाठी व्यायाम हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. व्यायामामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. अशा रुग्णांनी मध्यम प्रतीचा व्यायाम करावा. रोज ३० मिनिटे मध्यम किंवा तीव्र गतीने चालण्याचा व्यायाम हा सर्वांत उत्तम व्यायाम आहे. व्यायामपूर्वी १० मिनिटे वार्मअप होणे गरजेचे आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान यांचाही शरीरावर चांगला परिणाम होतो. मधुमेही व्यक्तींनी डॉक्टरच्या सल्ल्याने व्यायाम करावा.
शेवटी सर्वांत महत्त्वाचा संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगसाधना, ध्यान, व्यसनमुक्त जीवन, योग्य औषधोपचार आणि मधुमेह शिक्षण याद्वारे या आजारावर मात करता येऊ शकते. जो मधुमेही रुग्ण मधुमेहासंबंधी जास्तीत जास्त ज्ञान मिळवेल आणि योग्य तो उपचार करेल तो दीर्घायुषी होईल.