• Wed. Apr 30th, 2025

दुभंगलेली मने पुन्हा जुळली, तीन दाम्पत्यांचा संसार सावरणार !

Byjantaadmin

Nov 14, 2022

दुभंगलेली मने पुन्हा जुळली, तीन दाम्पत्यांचा संसार सावरणार !

▪️ राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मिटले वाद

लातूर, (जिमाका): कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. त्यातून पती-पत्नींनी एकमेकांविरुद्ध तसेच सासर आणि माहेरच्या मंडळींविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. संसाराची घडी विस्कटली, कोर्टात खटले सुरु झाले. त्यामुळे नातेसंबंधात कटुता आली. मात्र, आता आपापसातील वाद मिटविण्यासाठी करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे शनिवारी (दि.१२) राष्ट्रीय लोकन्यायालयात तीन दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची दुभंगलेली मने पुन्हा जुळल्यामुळे त्यांचा संसार सावरणार आहे.

मुळची लातूर जिल्ह्यातील असलेल्या मुलीचा बीड जिल्ह्यातील तरुणाशी २०१२ मध्ये विवाह झाला. दोनच वर्षात कौटुंबिक कलह निर्माण झाला आणि दोघे विभक्त राहू लागले. पत्नी आणि पतीने एकमेकांविरुद्ध आणि कुटुंबियांविरुद्ध पोलिसांत वेगवेगळ्या तक्रारी दिल्या. गेल्या आठ वर्षापेक्षा अधिक काळापासून दोघे विभक्त राहून कोर्टात लढत होते. त्यांचे प्रकरण राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवण्यात आले होते. यामध्ये दोघांनीही आपापसातील वादावर सामोपचाराने तोडगा काढत या वादाशी संबंधित चार खटले मागे घेवून पुन्हा एकत्र संसार करण्याचे मान्य केले. यावेळी पॅनल प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश आर.बी. रोटे आणि पॅनल पंच ऍड. अभिजित गणेश मगर यांनी काम पाहिले. वादीचे वकील ऍड. डी. जे. कदम, तसेच प्रतिवादीचे वकील के.आर.पाटील हे होते

लातूर शहरातील मुलाचे नात्यातीलच एका मुलीशी २०११ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुलीही आहेत. मात्र, कौटुंबिक वादातून सासर आणि माहेरच्या कुटुंबांमध्ये दुरावा आला. त्यामुळे पत्नी २०१७ पासून विभक्त राहत होती. कौटुंबिक न्यायालय, दोघांचेही वकील यांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी पती-पत्नींचे समुपदेशन केले. हे प्रकरणही राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवण्यात आले होते. यावेळी पती-पत्नी यांनी पुन्हा एकत्र येण्याचे मान्य केले. या प्रकरणात वादीचे वकील ऍड. बहरभुज कांबळे, तर प्रतिवादीचे वकील लहू सुरवसे होते.

लातूर जिल्ह्यातीलच आणखी एका दाम्पत्याचे प्रकरण याचवर्षी न्यायालयात दाखल झाले होते. दोन मुलांचे माता-पिता असलेल्या या दाम्पत्यानेही राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये परस्परातील वाद मिटवून घेत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यामध्ये वादीचे वकील ऍड. उदय गवारे, प्रतिवादीचे वकील ऍड. रणजित एम. लोमटे होते

अशाप्रकारे राष्ट्रीय लोकन्यायालयात करण्यात आलेले समुपदेशन, मार्गदर्शन, संबंधित वकिलांचे सहकार्य यामुळे तीन दांपत्यांच्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर येणार आहेच, सोबत सासर आणि माहेरच्या कुटुंबियांच्या नातेसंबंधात निर्माण झालेली कटुता दूर होण्यास मदत होणार आहे.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *