• Wed. Apr 30th, 2025

१ कोटी रुपये रोख आणि ६० तोळे सोने… लाचखोर तहसिलदाराकडे सापडले मोठे घबाड

Byjantaadmin

Nov 14, 2022

अलिबाग येथील तहसीलदार मीनल दळवी हिला लाच घेताना अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तिच्या संपत्तीची मोजदाद सुरू केली आहे

एसीबीच्या पथकाला दळवी हिच्याकडे मोठेच घबाड गवसले आहे. घरात तब्बल ६० तोळे सोने, अलिबाग येथे गाडीत आणि घरात एकूण ७५ हजार रुपये रोख तर, मुंबईतील विक्रोळी येथील घरातून १ कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली आहे. तशी माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक ज्योती देशमुख यांनी दिली आहे.

अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्यांच्या विक्रोळीतील घरातून एक कोटी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
एका जमिनीच्या बक्षीस पत्राच्या नोंदी प्रकरणासाठी २ लाखांची लाच घेणार्‍या अलिबागच्या तहसिलदार मीनल दळवी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे महसूल यंत्रणेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाने ही कारवाई केली आहे.

अलिबागमधील रोहन खोत यांच्या नातेवाईकांच्या कोळगाव येथील जमिनीच्या बक्षिस पत्राचे नोंदणी करण्याचे प्रकरण तहसिलदार कार्यालयाकडे दाखल झाले होते. सदर प्रकरण तहसीलदार मीनल दळवी यांनी बरेच दिवस हेतुता रेंगाळत ठेवले. त्या बक्षिस पत्राची नोंदही करण्यात आली नव्हती. या नोंदीसाठी रोहन खोत यांच्याकडे तहसिलदार मीनल दळवी यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २ लाख देण्याचे ठरविण्यात आले. सदर रक्कम आपला एजंट राकेश चव्हाण याच्याकडे पैसे देण्यास दळवी यांनी सांगितले.

खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर लेखी तक्रारही केली. या तक्रारीची दखल गांभीर्याने घेत एसीबी पथकाने गेले महिनाभर दळवी यांच्यावर पाळतही ठेवली. शुक्रवारी खोत यांना एजंट राकेश चव्हाण यांच्याकडे 2 लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. ते पैसे आणण्यासाठी राकेश हा खोत यांच्या बाजार समोरील एका मोबाईल या दुकानात गेला. खोत यांच्या कडून दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तहसिलदारांचे नाव सांगितले

त्यानुसार पथकाने तहसिलदारांना गोंधळपाड्यातील बेवूड सोसायटीमधील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मीनल दळवी यांना धक्काच बसला त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एसीबी पथकाने दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु केल्याचे सुत्रांनी सांगितले. अवैध मार्गाने त्यांनी किती संपत्ती जमा केली याची पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ही कारवाई केली आहे.

गेल्या वर्षी नवी मुंबई एसीबी पथकाने मुरुडचे तहसिलदार गमन गावित यांनाही अशाच प्रकारे लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तक्रारदार हे रायगडचे असून नवी मुंबई एसीबीकडून कारवाई केली जात आहे. तर, वरिष्ठ स्तरावरील अधिकारीच लाच घेताना पकडण्यात आल्याने प्रशासनाबाबत सर्वसामान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकाराने महसूल यंत्रणेतही खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *