राज्य उत्पादन शुल्क विभागाची निलंग्यात कारवाई
डोंगर पोखरून काढला उंदीर;तालुक्यातील हाॕटेल, धाब्यावर राजरोसपणे देशी, विदेशी अवैध दारूची विक्री उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार
निलंगा : शहरासह तालुक्यातील अनेक हाॕटेल्स व धाब्यावर देशी, विदेशी व हातभट्टीची राजरोसपणे विक्री सुरू असताना नुकतीच निलंगा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका हाॕटेलवरती कारवाई करून जवळपास चार हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई डोंगर पोखरून उंदीर काढल्याची उलटसुलट चर्चा सध्या चवीने चर्चीली जात आहे.
शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीला ऊत आला असून परवाना धारक बार मालकाकडून नियमाचे राजरोसपणे उलंघन होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. तालुक्यात जवळपास एकूण शंभरपेक्षा जास्त बिअरबार व परमिटरूम आहेत. बार व देशी दारू दुकानात सर्रासपणे नियमाचे उलंघन केले जात असून दुकानात कसल्याच प्रकारे ग्राहकांना सुविधा पुरवली जात नाहीत. अनेक बार व देशी दुकानात शौचालय व प्रसाधन गृह नाहीत. शिवाय चढ्या भावाने दारू विक्री केली जाते याकडे संबंधिताचे दुर्लक्ष होत आहे. अनेक हाॕटेलच्या नावावर देशी, विदेशी, हातभट्टी विकली जात असताना याकडे उत्पादन शुल्कचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात बनावट दारू विविध बार मध्ये विक्री केली जात असून संबंधित बार मालकावर वचक नसल्यामुळेच अवैध व वैध धंदे करणाऱ्यानी डोके वर काढले आहेत.
………
डोंगर पोखरून उंदीर
……..
राज्य उत्पादन शुल्क लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा येथे हॉटेल आराध्या येथे अवैध मद्याचा गुन्हा नोंदविण्यात आला त्यामध्ये एकूण १० जणांना अटक करण्यात आली होती या प्रकरणी तीन हजार ९९५ रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी मद्यपीं तसेच धाबा मालक यांच्यावर कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये हॉटेल व मद्यपींवर कारवाई करण्यात आली. अटक करून न्यायालयात हजर केले असता ढाबा मालक यांना रु. पंचेवीस व इतर मद्यपींना एक हजार प्रत्येकी दंड आकारण्यात आला असा एकूण ३४ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई
उत्पादन शुल्क निरीक्षक उदगीर आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक स्वप्नील काळे, अ. ब. जाधव, एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले यांनी सहभाग घेतला होता.