• Wed. Apr 30th, 2025

‘भारत जोडो’साठी अकोल्यातील बाळापूरच्या शेतकऱ्याने उभे पीक कापून जागा दिली

Byjantaadmin

Nov 13, 2022

‘भारत जोडो’साठी अकोल्यातील बाळापूरच्या शेतकऱ्याने उभे पीक कापून जागा दिली

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची तयारी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुखद धक्का बसला, जेव्हा एका शेतकऱ्याने उभे पीक कापून राहुल गांधी यांच्या मुक्कामसाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली. ही घटना घडली अकोल्यातील बाळापूरमध्ये. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देशात दुहीचे राजकारण सुरू केले असले तरी अजूनही यात्रेकरूंच्या स्वागत करण्याचे औदार्य समाजात टिकून असल्याचे मत काँग्रेस नेते व्यक्त करीत आहेत.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेच्या तयारीची जबाबदारी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली. त्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीला अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे यात्रेची तयारी करताना हा वेगळा अनुभव आला. बाळापूर तालुक्यात १७ आणि १८ नोव्हेंबर असे दोन दिवस यात्रेचा कार्यक्रम असून या दरम्यान राहुल गांधी यांचा मुक्काम बाळापूर तालुक्यात होणार आहे. त्या तयारीचा आढावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर आणि डॉ. नितीन राऊत यांनी घेतला.
यात्रेकरूंचा मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी जागेचा शोध सुरू होता. तेव्हा स्थानिक शेतकरी हादे गुरुजी यांना ती गोष्ट कळली. त्यांनी आठ एकरातील उभे पीक कापून शेतजमीन यात्रेकरूंसाठी देण्याची तयारी दर्शवली. लगेच मजूर बोलावून शेतातील तुरीच्या पिकाची कापणी करून जागा मोकळी करून दिली.
महाराष्ट्रात यात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून प्रवेश केला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात १७ नोव्हेंबरला यात्रा येत आहे. तालुक्यातील बाद फाटा येथे राहुल गांधी यांचा मुक्काम राहणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय दुबे म्हणाले, हादे गुरुजी यांची बाळापूर तालुक्यात बाद फाटा येथे आठ एकर शेतजमीन आहे. त्यांनी स्वत:हून जमीन देण्याची इच्छा व्यक्त केली. काँग्रेसचा एवढा मोठा नेता येत आहे. त्यांना मुक्काम करायचा आहे. त्यांच्या मुक्कामासाठी मी जमीन देणे माझे भाग्य समजतो, अशी भावना हादे गुरुजींनी व्यक्त केली, असेही दुबे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *