केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक विधानांमुळे सतत चर्चेत असतात. आता सध्याच्या राजकीय घडामोडीवर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि सेवाकारण हे राजकारण आहे. सध्या जे सुरु आहे, ते सत्ताकारण आहे, असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, “करोना काळात आम्ही पैसे गोळा करून अन्नधान्य आणि किराणा माल आदिवासी भाग आणि मेळघाटात देण्याचं काम केलं. ‘आपला परिसर, आपला विकास’ या मोहिमेअंतर्गत अतिदुर्गम भागातील ५ तरुणांची निवड केली. त्यांना स्कॉलरशिपसह ५ वर्षासाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहे.”
आदिवासी भागातील पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ६४ मुलं आणि ५३ मुलींना नागपुरात शिक्षणासाठी आणलं आहे. यातील मुली नंदनवन येथील हिंदू मुलींच्या शाळेत ५ ते १२ च्या वर्गात शिक्षण घेत आहेत. यातील मुलींना ‘खासदार क्रीडा’ स्पर्धेत बक्षीस मिळालं आहे. तर, अंजनगाव-सुर्जी येथील ११५ तरुणी-तरुणींनाही मदत करत आहोत,” असं नितीन गडकरींनी म्हटलं.
“मी सगळ्या खासदार, आमदार, जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना सतत आवाहन करतो की, हेच राजकारण आहे. समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, सेवाकारण हे राजकारण आहे. सध्या जे सुरु आहे, ते सत्ताकारण आहे. सत्ताकारण नक्की करावं. पण, सेवाकारण आणि विकासकारण केल्यावर समाजिक, आर्थिक परिवर्तन होईल,” असेही नितीन गडकरींनी सांगितलं.