रत्नागिरी: कोकणात अलीकडे एसटीच्या अपघातांचे प्रमाण वाढल आहे. शासनाकडून अत्याधुनिक एसटी बसेस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रवासी वाढवण्यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत. अशातच आता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथील एसटी चालकानेच देवरुख आगार व्यवस्थापकावर मनमानी करत एसटीच्या गाड्यांकडे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
देवरुख-पुणे व देवरुख-साखरपा मार्गे अर्नाळा या एसटी बसने प्रवास करू नका, प्रवास टाळा व स्वतःचे जीव वाचवा असे या चालकाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. देवरुख आग्रहाचे चालक अमित आपटे यांचा हा व्हिडिओ सध्या खळबळ माजवणारा ठरला आहे. या मार्गावरील एसटी बसेस बाबत अनेकदा ब्रेकडाऊन सारखे गंभीर प्रकार घडत आहेत मात्र, याकडे आगार व्यवस्थापक देण्यास तयार नाही अशा स्वरूपाचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे व आम्हाला न्याय द्यावा अशी मोठी मागणी करत या व्हिडिओ नंतर आपल्याला घरीच बसवले जाणार आहे याचीही पूर्ण कल्पना आहे असेही या चालकाने म्हटलं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या सगळ्या प्रकाराची गांभीर दखल घेत चौकशी करण्याकरता विभाग नियंत्रक कार्यालयाकडून सुरक्षा सहाय्यक व तांत्रिक विभाग कर्मचारी अशा दोन जणांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील योग्य ती कारवाई तात्काळ केली जाईल अशी माहिती त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ ला दिली. दरम्यान, या चालकाने व्हिडिओ व्हायरल करून एसटीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रार करायची होती तर ती योग्य मार्गाने तक्रार करणे आवश्यक होते यामुळे या चालकावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे. दरम्यान आता या सगळ्या चौकशीनंतर नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते हे पहाणे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.