• Sun. Aug 17th, 2025

रक्तात काँग्रेसच, सत्यजीत तांबेंकडून घरवापसीचे संकेत

Byjantaadmin

Aug 25, 2023

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेस पक्षातून निलंबित झालेले आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून घरवापसीचे संकेत देण्यात आले आहेत. सत्यजीत तांबे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली होती. याच कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावर आता पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी व्यक्त करत मला काँग्रेसमधून टार्गेट करून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. मात्र, आजही माझ्या रक्तात काँग्रेस असल्याचं सांगत तांबेंनी पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

 

Satyajeet Tambe Congress

पुण्यातील एस एम जोशी सभागृह येथे परिवर्तन युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यजित तांबे हे उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी जाहीर करत आता निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे असे म्हटले आहे.राज्यातील सध्याच्या राजकारणावर सत्यजीत तांबे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, नव्या राजकारणाची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. नवं राजकारण सुरू करताना सगळ्या युवकांनी पुढे येणं गरजेचं आहे, असे त्यांनी म्हटले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पुढे काय याबाबत सत्यजित तांबे यांना विचारलं असता ते म्हणाले की, काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर काढलं आहे. त्यांनी मला काँग्रेसमधून बाहेर ढकलून दिलं आहे. पण आमच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. २०३० साली १०० वर्ष माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये येऊन पूर्ण होत आहे. पण मला काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असेल तर ती आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की मला त्यांनी परत बोलावलं पाहिजे. अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले.तुमची काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा आहे का? यावर तांबे यांना विचारलं असता ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जो एपिसोड झाला तो सगळ्यांच्या समोर आहे आणि कशा पद्धतीने राजकारण माझ्याबरोबर झाल हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखे अनेक चांगले काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ठराविक नेत्यांकडून बाहेर ढकलण्यात आले आहे. ही चिंतेची बाब आहे यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे, असे तांबे यांनी सांगितले.तर, राज्यात तसेच नगर जिल्ह्यात ज्या जातीय दंगली होत आहे. त्यावर विचारलं असता ते म्हणाले की दोन धर्मांमध्ये दोन जातींमध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो कुणी करू नये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कोणाच्या मोर्चानंतर वातावरण बिघडत असेल तर ते चुकीचे आहे, असेही तांबे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *