समाज व्यवस्था बदलण्याची ताकत शिक्षकांमध्ये आहे. – डॉ. भास्कर गायकवाड
निलंगा – आपल्याला शिक्षणा मधून काय साध्य करायचे आहे हा विचार केल्याशिवाय चांगल्या शिक्षणाची वाटचाल होणार नाही. शिक्षक हाच शिक्षण व्यवस्थेतील वाहक आहे. शिक्षणासंदर्भातील कोणतीही योजना शासनाने आणली तर त्याची अंमलबजावणी करणारा केंद्रबिंदू शिक्षक हाच आहे. विद्यार्थ्यांच्या शरीराला आणि मनाला वळण लावण्याचे काम , चांगला विचार नवीन पिढीमध्ये संक्रमित करण्याचे काम तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामजिक जाणीव निर्माण करण्याचे काम शिक्षकच करतो. म्हणजेच समाज व्यवस्था बदलण्याची ताकत शिक्षकांमध्ये आहे. असे मत प्रा.डॉ.भास्कर गायकवाड यांनी व्यक्त केले. ते निलंगा येथील महाराष्ट्र अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमांत बोलत होते. ते पुढे म्हणाले की समाज व्यवहाराचे सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे भाषा आहे, त्यामुळे चांगली भाषा विद्यार्थ्यांच्या गळी उतरवली पाहिजे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्षात प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व लेखणी देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा.श्री. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, सचिव मा. श्री. बब्रूवानजी सरतापे यांनीही विद्यार्थ्यांना संदेशामार्फत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सचिन जाधव होते. आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात प्रा.सचिन जाधव यांनी, शिक्षकांचे हक्क व कर्तव्य यावर प्रकाश टाकला. तसेच महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. विश्वकर्मा सलघंटे यांनी अध्यापन शाखेतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या संधीची माहिती करून दिली.याप्रसंगी प्रा. संदीप कुमठेकर, प्रा. गोविंद सगरे, प्रा. प्रमोद बऱ्हाणपुरे यांचीही उपस्थिती विचार मंचावर होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गोविंद सगरे यांनी केले. सूत्रसंचालन कु. पूजा वाघमारे, कु. नाजीया अरब यांनी केले तर आभार कु. रईसा अरब यांनी मानले.
