• Sun. Aug 17th, 2025

मनपाची परवानगी घेवूनच बॅनर्स लावावेत ; पोलीस कारवाई करण्याचा इशारा

Byjantaadmin

Aug 24, 2023

मनपाची परवानगी घेवूनच बॅनर्स लावावेत

जाहिरात एजन्सीज व छपाई करणाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांचे निर्देश पोलीस कारवाई करण्याचा इशारा

  लातूर/प्रतिनिधी:मनपा क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी घेऊनच शहरात पोस्टर्स,बॅनर्स व होर्डिंग्स लावावेत.परवानगी न घेता बॅनर्स लावल्याचे अथवा छपाई केल्याचे आढळले तर संबंधित आस्थापना सिल करुन, बंद करण्यात येईल व पोलीस कारवाई केली जाईल,असा इशारा मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिला आहे.

उच्च न्यायालयाने अनधिकृत पोस्टर्स,बॅनर्स, होर्डींग व कमानी संदर्भात दिनांक 31 जानेवारी 2017 रोजी PIL  NO –  155/2011 द्वारे आदेश दिलेला आहे.अनधिकृतपणे पोस्टर्स, बॅनर्स,होर्डींग व कमानी लावणाऱ्यांविरुद्ध मालमत्ता विरुप्पन प्रतिबंध कायदा 1995 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत तरतुदीनुसार कारवाई केली जाते.यासाठी मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रभाग प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे  मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या अध्यक्षतेत मनपा कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली. जाहिरात एजन्सीज तसेच पोस्टर्स,होर्डिंग व कमानी छपाई करणाऱ्या व्यावसायिकांसह वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत बोलताना आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी मनपा क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी घेऊनच होर्डिंग लावण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.पोस्टर होर्डिंग व बॅनरवर परवानगीचा क्यू आर कोड लावणे बंधनकारक असेल.संबंधित बॅनर्सवर मनपाकडून मिळालेला जाहिरात क्रमांक व कालावधी दर्शविण्यात यावा.पालिकेने तात्पुरत्या स्वरूपातील जाहिरात बोर्ड,बॅनर्स व पोस्टर्ससाठी जागा ठरवून दिलेल्या असून त्या जागांची यादी क्षेत्रीय कार्यालयात नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.पोस्टर्स लावण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयातून सुट्टीच्या दिवशीही परवानगी दिली जात आहे.ठरवून दिलेल्या जागेशिवाय इतर ठिकाणी परवानगी न घेता पोस्टर्स लावून कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध दंडनीय कार्यवाही सोबतच पोलीस कार्यवाही केली जाईल,असा इशाराही आयुक्तांनी या बैठकीत बोलताना दिला. शहरातील नोंदणीकृत राजकीय पक्ष,राजकीय संघटना आणि नागरिकांनी विविध कार्यक्रमानिमित्त पोस्टर्स व बॅनर्स लावताना मनपाची परवानगी घ्यावी. अनधिकृतपणे पोस्टर्स लावून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि मनपास सहकार्य करावे,असे आवाहनही आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी या बैठकीत बोलताना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *