डॉ.शिरोडकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केला कु.समृद्धी तुरंबेकर चा सत्कार
मुंबई-नेहरू सेंटर (वरळी प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
सरस्वती पुरुषोत्तम मेमोरियल ट्रस्ट, मुंबई ही संस्था गेली 33 वर्षे लहान मुलांसाठी सातत्याने चित्रप्रदर्शन आयोजित करत असते.14 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून ही संस्था या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना उत्तेजन मिळावं त्यांची चित्रकला अधिकच वृद्धिंगत व्हावी या हेतूने. संस्थेचे अध्यक्ष डॉ.मधुश्री सावंत आणि चिटणीस अरविंद सावंत हे नेहमीच प्रगतशील असतात. नुकतंच त्यांनी लहान मुलांसाठी वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत दिनांक 8 नोव्हें ते 13 नोव्हें पर्यंत चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले असून या चित्र प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध शाळांतील अनेक लहान मुलामुलींनी सहभाग घेतला होता. आणि प्रत्येक सहभागी मुलामुलींना प्रोत्साहन मिळावे म्हणुन प्रमाणपत्र देऊन त्यांचा याठिकाणी गौरव करण्यात आला. विशेषकरून दादर येथील आय ई एस राजा शिवाजी विद्यालय मधिल इयत्ता नववी मध्ये शिकणारी हुशार विद्यार्थिनी कु.समृद्धी संजय तुरंबेकर हिने देखील या चित्रप्रदर्शनात मोलाचा सहभाग घेऊन आपल्या चित्रांचे प्रदर्शन मांडले असून तिच्या या चित्रांना ज्येष्ठ विनोदी अभिनेते अशोक सराफ यांनी देखील नावाजले आहे़. समृद्धी हिने आपल्या सुबक कल्पनेतुन उल्लेखनीय आणि अभ्यासपूर्ण चित्र प्रदर्शित करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक सेलिब्रिटी, मान्यवर यांनी आपल्या मुलांसह या लहान मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला येवून चित्रांचा आनंद द्विगुणित करून काही निवडक चित्रं खरेदी देखील करत आहेत. याप्रसंगी परेल येथील डॉ.शिरोडकर हायस्कूल मधिल 1988 सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवुन समृद्धीचा तिने प्रदर्शित केलेल्या उत्कृष्ठ चित्राबद्दल यथोचित सत्कार करून तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अजीत साकरे, श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, डॉ.संतोष यादव, देवेंद्र पेडणेकर, संजय तुरंबेकर आणि महेश्वर तेटांबे आदी मान्यवर उपस्थित होते. समृद्धी ही केवळ चित्रकलेतच पारंगत नसून अभिनयात सुद्धा तिने आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. अल्पावधीतच संपन्न केलेल्या आणि प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या तिच्या या चित्रकलेसाठी मुंबई महाराष्ट्रांत तिचे भरभरून कौतुक होत आहे.