• Wed. Apr 30th, 2025

ही काय जादूची कांडी आहे का? सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर शिंदेंचा खोचक सवाल

Byjantaadmin

Nov 13, 2022

मुंबई:-ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे प्रकल्प विरोधकांच्या काळात गेले त्याचं पाप आमच्या माथी मारलं जात आहे” असा आरोप शिंदे यांनी केला आहे. “एवढा मोठा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात इकडून तिकडे जाऊ शकतो का? ही काय जादूची कांडी आहे का? बोलण्याला पण काही अर्थ असला पाहिजे” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

“राज्यात उद्योग आणण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहे. या राज्यातून एकही प्रकल्प जाऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रकल्पावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सुप्रिया सुळेंना सुनावले आहे. “केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये योजना राबवत असते. सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवले जातात. प्रत्येकवेळी प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहे हा कांगावा करणं चुकीचं आहे. यामुळे महाराष्ट्राची तर बदनामी होतेच, शिवाय जे अधिकारी या प्रकल्पासाठी पाठपुरावा करतात तेही निराश होतात”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आहेत?

सुप्रिया सुळेंनी ‘लोकमत’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्ताचा हवाला देत, ऊर्जा निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका केली आहे. “महाराष्ट्र सरकारचे आणखी एक अपयश…राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे ‘वेदान्त फॉक्सकॉन’, ‘बल्क ड्रग्ज पार्क’ आणि ‘टाटा एअरबस’ हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. यानंतर आता ‘ऊर्जा उपकरण निर्मिती झोन’ प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर…” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशात गेल्याचं वृत्त ‘लोकमत’ने दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *