शेगावमध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा येताच देशातील सर्वात मोठी जाहीर सभा घेण्याचे नियोजन काँग्रेसतर्फे केले आहे. आनंदसागर समोरील भव्य मैदानावर काम सुरू आहे. १८ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता होणाऱ्या सभेत उद्धव ठाकरेही सहभागी होऊ शकतात अशी माहिती बुलडाण्याचे प्रभारी तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दिली.
शनिवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता ते आढावा बैठकीसाठी औरंगाबादेत आले होते. त्या वेळी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘देशात महागाई वाढली आहे. मुस्लिम आणि दलितांवर अत्याचार होत आहे. भय, विद्वेष आणि धर्मांध राजकारणातून सत्तेत राहण्याचे तंत्र अवलंबले आहे. असे असताना विरोधी पक्षातील एकही नेता भूमिका घेताना दिसत नाही. राहुल गांधी केंद्राच्या विरोधात भूमिका घेत आहेत. त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळतोय. पण शेगावची सभा आत्तापर्यंतची सर्वात मोठी सभा असेल. ८ लाख लोक सभेला येतील. तसे नियोजन केले जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक काही तासांमध्येच शेगाव शहरामध्ये दाखल होणार असल्याने त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्याचे आवाहन हंडोरे आणि इतर सदस्यांवर राहणार आहे. त्या दृष्टीने यशोमती ठाकूर, राहुल बोंद्रे, संजय राठोड आदींची समिती तयार झाली आहे. सभेला स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असेही हंडोरे यांनी म्हटले.