• Sun. Aug 17th, 2025

हिमाचलमध्ये पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती, थरारक VIDEO आला समोर; पावसामुळे आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू

Byjantaadmin

Aug 24, 2023

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह उत्तर भारतात तुफान पाऊस सुरू आहे. अनेक भागात ढगफुटी, पूर आणि दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे अनेक राज्यातले ५०० हून अधिक रस्ते बंद आहेत. ढगफुटी होऊन हिमाचल प्रदेशातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागांमधली परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक बहुमजली इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. इमारती कोसळल्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kullu 7 buildings collapse

 

अतिवृष्टीमुळे सुरू असलेला हा भीषण विध्वंस व्हिडीओमध्ये दिसत आहे.कुल्लू हे हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. परंतु, अतिवृष्टीमुळे या निसर्गरम्य ठिकाणी सध्या विध्वंस सुरू आहे. कुल्लू येथील नवीन बसस्थानकाजवळ नुकतीच एक मोठी नैसर्गिक दुर्घटना घडली आहे. मअवघ्या काहीच सेकंदात या भागातल्या ७ इमारती एकामागून एक कोसळल्या.

सततच्या पावसामुळे या इमारतींना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसांपूर्वीच या इमारती रिकाम्या केल्या होत्या. येथील आठ धोकादायक इमारतींमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यापैकी ७ इमारती कोसळल्या आहेत. एक धोकादायक इमारत सध्या तरी उभी आहे. परंतु, ही इमारतदेखील कधीही कोसळू शकते, असं सांगितलं जात आहे.हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. राज्याची राजधानी शिमल्यामध्ये २०१७ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. शिमल्यात पावसाने १२२ वर्षांचा विक्रम मोडित काढला आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी, शिमला आणि सोलानमध्ये गेल्या २४ तासांत ढगफुटीच्या ४ घटना घडल्या आहेत. राज्यात पावसामुळे काल (गुरुवारी) ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. शिमल्यात ३, तर मंडीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर, मंडी, शिमला, सोलानमधील अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्यातले तीन राष्ट्रीय महमार्ग आणि ५३८ रस्ते पावसामुळे बंद आहेत.या महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये पावसासह नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये १२० लोकांचा बळी गेला आहे. हिमाचल प्रदेशात मान्सून सुरू झाल्यापासून म्हणजेच २४ जूनपासून आतापर्यंत तब्बल २३८ लोकांचा जीव गेला आहे. तसेच ४० जण अद्याप बेपत्ता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *