रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पुनरुच्चार केला आहे. शिर्डीतील उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोबत चर्चा झाल्याचा दावाही आठवले यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना केला. रामदास आठवले यांचे शिर्डीतून लोकसभा उमेदवारी साठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून हिरवा कंदील असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत आठवले यांनी याआधीही अनेकदा वक्तव्ये केलेली आहेत. एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सोबत असलेल्या दलित मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवून भाजपची त्यांच्या उमेदवारीला अनुकूलता असल्याची चर्चा आहे. आठवले यांनी शिर्डीसह लोकसभेसाठी आरपीआयला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी नड्डा यांच्यासमोर ठेवली आहे.