• Mon. Aug 18th, 2025

आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करा- जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Aug 23, 2023

आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न कराजिल्हाधिकारी ठाकूर-घुगे

लातूर  (जिमाका) : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्य विभागाच्या विविध समितीच्या बैठका 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्या. आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप ढेले,                एस.एम.ओ. डॉ. अमोल गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, अधिष्ठाता  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. सचिन जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते.

एन.एच.एम. नियामक मंडळ, एन.एच.एम. लेखा परिक्षण समिती, लसीकरण समिती, विषेश इंद्रधनुष्य मोहिम समिती, प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुकाणू समिती, प्राणीजन्य आजार समिती, वातावरण बदल समिती, जिल्हा गुणवत्ता समिती, एन.पी. .पी.सी.एफ.समिती, 15 वा वित्त आयोग समिती, जन्म मृत्यू समिती, बोगस वैद्यक व्यावसायीक प्रतिबंध जिल्हा पुनर्विलोकन समिती, एल.सी.डी.सी. व ए.सी.एफ. मोहिम, टी.बी. फोरम व कोमॉर्बीडीटी कमिटी, आर. के. एस. के. समितीचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी घेतला.गरोदर माता नोंदणी कमी असून रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांचे प्रमाण, माता मृत्यू रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. सर्व बालकांचे लसीकरण पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकामार्फत सर्व अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची काटेकोर आरोग्य तपासणी करून डोळे, कान, दात व हृदयरोग यांचे लवकर निदान व उपचार करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रसूती रुग्ण, सर्प दंशाचे रुग्ण यांना विनाकारण संदर्भसेवा देण्यात येऊ नये, असे त्यांनी सांगितले.सद्यस्थीतीत जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू होऊ नये, असंसर्गजन्य आजारापासून नागरिक दूर रहावेत, यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवाव्यात. वाड्या, वस्त्या, तांडा, वंचित समूहातील घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आवश्यकतेप्रमाणे इतर विभागाची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *