ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी केले २५ वर्ष वयाच्या वडाच्या झाडाचे पुन:रोपण
लातूर – दिनांक २३-०८-२०२३ रोजी सकाळी ६ ते ६.१५ दरम्यान ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य पूर्वनियोजित कार्या करीता रिंग रोड वरून जातेवेळी मानकरी पेट्रोल पंपाजवळ एक अंदाजे २० ते २५ वर्ष वयाचे वडाचे झाड निर्दयीपणे मुळासह उपटून रोडवर टाकल्याचे लातूर ग्रीन वृक्ष टीमच्या सदस्यांनी पाहिले आणि त्या क्षणापासून सुरू झाली पळापळ, प्रत्येक सदस्य आपण या झाडास जीवदान द्यायचे या उद्देशाने प्रयत्न करताना प्रत्यक्ष दर्शनी लातूरकर सुद्धा अचंबित होऊन पाहू लागले. एखाद्या अपघातात आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीकरिता ज्याप्रमाणे एखाद्याच्या मनाची घालमेल होते, त्यापेक्षा किंचितही वेगळ्या प्रसंग प्रत्यक्ष दर्शनी लातूरकरांनी अनुभवला नसेलच, उद्देश या झाडाचे पुन:रोपण एवढाच, प्रत्येक सदस्य ट्रॅक्टर, जेसीबी, कटिंग मशीन लवकरात लवकर मिळवण्याच्या उद्देशाने फोनवर व्यस्त असल्याचे दिसत होते.
रिंग रोडवर गटार बनवण्याकरिता हे वडाचे वृक्ष अतिशय निर्दयी पद्धतीने रोडवर उपटून टाकण्यात आले होते, सगळीच लोक निर्दयी असतात अशी नाही समाजात आज पण काही जागरूक नागरिक व प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या नि:स्वार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीम सारखे वृक्षप्रेमी नागरिक सुद्धा आहेत, परंतु निर्दयी लोकांच्या समोर त्यांची संख्या फारच नगण्य आहे हे सत्य नाकारता येणार नाही.ग्रीन लातूर वृक्ष टीमने सदर झाड उपटून टाकल्याचे पहिले ती वेळ सकाळची असल्याने बरीच मंडळी साखर झोपेत होती, त्यामुळे जेसीबी, ट्रॅक्टर, कटिंग मशीन, पाण्याचा टँकर ही साधने गोळा करण्याकरिता प्रचंड धावपळ करून वेगवेगळ्या एजन्सीला फोन करून हे सर्व एकत्रित केले. आता प्रश्न होता तो झाडाचे पुन:रोपण करण्याचे ठिकाण, यासाठी श्रीकृष्ण मंदिर कातपूर रोड या मंदिरचे अध्यक्ष सुरवसे साहेब यांनी मंदिर परिसरात या वडाचे झाडाचे रोपण करण्यास परवानगी दिली आणि सुरुवात झाली प्रत्यक्ष कामाला. पहिल्यांदा वडाचे झाडाच्या फांद्या योग्य मापात कापून घेतल्या जेणेकरून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवणे व वाहतूक करण्यास अडचण येणार नाही आणि जेसीबीच्या साह्याने सदर झाड ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आले तसेच जेसीबीच्या साह्याने श्रीकृष्ण मंदिर कातपूर येथे चार फूट बाय सहा फूट आकाराचा खड्डा घेऊन त्यामध्ये सदर झाडाचे पुन:रोपण करून मुबलक पाणी देऊन, ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या आठवे वृक्ष पुन:रोपण यशस्वीपणे पूर्ण केले.
श्रीकृष्ण मंदिरातील उपस्थित महिलांनी या वडाचे वृक्षाची विधिवत पूजा करून, श्रीकृष्ण भगवानांना सदर वृक्षास जीवदान मिळावे यासाठी प्रार्थना केली.या कार्यात मोलाचे सहकारी लाभले ते जागरूक नागरिक श्री. किरणजी जाधव, अध्यक्ष काँग्रेस लातूर शहर, श्री सुरवसे साहेब अध्यक्ष श्रीकृष्ण मंदिर, जेसीबी, ट्रॅक्टर, टॅंकर इत्यादीचे चालक, अग्निशमन दल कर्मचारी, मनपा अधिकारी तसेच ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी अफाट मेहनत घेऊन हे वृक्ष पुन:रोपन कार्य यशस्वीपणे पूर्ण केले.हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पदमाकर बागल, सुलेखा कारेपूरकर, तुळसा राठोड, ऍड वैशाली यादव, सिताराम कंजे, नागसेन कांबळे, दयाराम सुडे, कांत मरकड, पांडुरंग बोडके, अमृता दाताळ, ओंकार सदरे, गणेश सुरवसे, मुकेश लाटे, देशमुख रवींद्र,आदित्य स्वामी यांनी परिश्रम घेतले.