• Mon. Aug 18th, 2025

तिकीट नाकारताच माजी उपमुख्यमंत्र्यांना कोसळलं रडू, कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Byjantaadmin

Aug 23, 2023

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी एकूण ११९ जागांसाठी ११५ उमेदवारांची नावे जाहीर केली. ते स्वत: गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार थातिकोंडा राजैया यांना उमेदवारी नाकारली.

 

घानपूर (स्टेशन) मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीने (BRS) तिकीट नाकारल्यानंतर तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजैया भावूक झाले. त्यांना कार्यकर्त्यांसमोरच रडू कोसळलं. आमदार राजैया यांचा रडतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.राजैया हे घानपूर (स्टेशन) मतदारसंघाचे विद्यमान आमदार असले तरी, BRS प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांची उमेदवारी नाकारली आहे. केसीआर यांनी बीआरएसचे ज्येष्ठ नेते कडियाम श्रीहरी यांना घानपूर येथून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार राजैया हे आंबेडकर पुतळा केंद्रात पोहोचले. यावेळी राजैया यांच्या समर्थकांनी “जय राजैया, जय तेलंगणा” अशा घोषणा दिल्या. यानंतर आमदार राजैया भावूक झाले आणि कार्यकर्त्यांसमोरच त्यांना रडू कोसळलं.खरं तर, काही महिन्यांपूर्वी त्यांच्याच पक्षाच्या एका सरपंचाने राजैया यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या आरोपामुळेच राजैया यांची उमेदवारी नाकारल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे तेलंगणा विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *