• Tue. Aug 19th, 2025

४०६८ मालमत्ताधारकांना मिळाली ७ लाख रुपयांची सूट मनपाच्या निर्णयाचा फायदा ; नागरिकांनी लाभ घेण्याचे पालिकेचे आवाहन

Byjantaadmin

Aug 23, 2023

४०६८ मालमत्ताधारकांना मिळाली ७ लाख रुपयांची सूट मनपाच्या निर्णयाचा फायदा ; नागरिकांनी लाभ घेण्याचे पालिकेचे आवाहन

   लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या पद्धतीने सवलत जाहीर केली होती.शहरातील ४०६८ मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेत एकूण ७ लाख २ हजार ९०२ रुपयांचा कर भरणा पालिकेकडे केला आहे. शहरातील इतर मालमत्ताधारकांनीही या कर सवलत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

    शहरातील मालमत्ता धारकांकडे थकलेला कर वसूल करण्यासाठी मनपाने चालू आर्थिक वर्षातील फक्त मालमत्ता करामध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.३१ जुलै अखेरपर्यंत मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना ५ टक्के तर ३१ऑगस्ट पर्यंत कर भरणाऱ्यांना ४ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.३१ जुलै अखेरपर्यंत शहरातील एकूण २९९४ मालमत्ता धारकांनी याचा लाभ घेतला.या मालमत्ता धारकांकडून ३ कोटी ४ लाख ७४ हजार ५५८ रुपये कर येणे अपेक्षित होते.या मालमत्ता धारकांनी ५ टक्के सवलतीचा लाभ घेत एकूण २कोटी ८९ लाख ९४ हजार २१८ रुपयांचा भरणा पालिकेकडे केला. त्यामुळे या मालमत्ता धारकांचे ५लाख ८०  हजार ३४० रुपये वाचले.

   मनपाने ऑगस्ट महिना अखेरपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना ४ टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे.त्यानुसार दि.१ ते २१ ऑगस्ट या कालावधीत १०७४  मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेत कर भरणा केला.या मालमत्ता धारकांकडून ९३लाख ६१ हजार ५१ रुपये कर येणे बाकी होते.४ टक्के सवलतीचा लाभ घेत या मालमत्ता धारकांनी एकूण ९२ लाख ३८ हजार ४८९  रुपयांच्या कराचा भरणा मनपाकडे केला.त्यामुळे या मालमत्ताधारकांचे १ लाख २२ हजार ५६२  रुपये वाचले.

    शहरातील इतर मालमत्ताधारकांनीही या सवलत योजनेचा लाभ घ्यावा.ऑगस्ट अखेरपर्यंत ४ टक्के सवलत योजना सुरू राहणार आहे.या कालावधीत आपल्याकडील कराचा भरणा करावा,असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *