कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांनी उडी घेतलीय. केंद्र सरकारने कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी पवारांनी केलीय. 2410 रुपयांचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. यात त्यांचा उत्पादन खर्च निघणार नसल्याची भूमिका पवारांनी घेतलीय. कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करण्याची मागणीही शरद पवार यांनी केली आहे.
दरम्यान शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात शुल्कावर 40% कर लादल्याने नाशिकच्या सर्व बाजारसमित्यांमध्ये कांदा खरेदी बंद आहे. खरेदी बंद असल्यामुळे कांदा तीनशे रुपयांनी घसरलाय. कांद्याचा भाव 2000 ते 2400 च्या दरम्यान आला आहे.
सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्यायावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्वच मंत्री कामाला लागले आहेत. एकिकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवर गेले आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौऱ्यावर असतानाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार महाराष्ट्रातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच त्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे दोन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. केंद्र सरकार 2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करेल.