महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत ११व्या शतकातील कल्याणी चालुक्य राजवटीतील हरीहरेश्वर (निलकंठेश्वर) मंदिर हा या परीसराचा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. हे मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीने अद्वितीय असे आहे. शिव आणि विष्णू देवतेचा समन्वय यात दिसून येतो म्हणून हे मंदिर हरीहरेश्वर या नावाने ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी या अभ्यास भेटीतुन स्थानिक इतिहासाचा वारसा समजावून घेतला. यावेळी श्रावणमासानिमीत्त विद्यार्थ्यांनी मंदिर स्वच्छताही केली.
हैदराबाद मुक्ती लढ्यातील महत्वाचा वारसा असलेल्या आर्य समाज मंदिर व हुतात्मा स्मारकासही यावेळी भेट देण्यात आली. यातून निलंगा परीसरात आर्य समाजाने निजाम सत्तेविरुद्ध यापरीसरात केलेली लोकजागृती, आर्य समाजाची रझाकारांनी केलेल्या नुकसानीची भरपाई निजाम सरकारने भरून द्यावी म्हणून लढलेला संवैधानिक लढा आणि हुतात्म्यांनी दिलेले बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांनी भोगलेला कारावास इत्यादी घटना इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. सुभाष बेंजलवार, प्रा. दत्ता पवार, प्रा अनुराधा महाजन यांनी विद्यार्थांना समजावून सांगितल्या.
या स्थानिक वारसा स्थळांच्या अभ्यास भेटीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभाग व आजादी का अमृतमहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी इतिहास विभागाचे डॉ. सुभाष बेंजलवार, आजादी का अमृत महोत्सव समिती समन्वयक डॉ. भास्कर गायकवाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा. दत्तात्रय पवार, प्रा. अनुराधा महाजन, प्रा. पृथ्वी फावडे श्री मनोहर एखंडे इत्यादिंनी परीश्रम घेतले.