• Tue. Aug 19th, 2025

सत्काराला बुके नको, बुक किंवा रोपटे द्या..!

Byjantaadmin

Aug 22, 2023
सत्काराला बुके नको, बुक किंवा रोपटे द्या..!
• जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन
लातूर  (जिमाका) : वृक्षाचं आच्छादन कमी असलेल्या लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीला चालना मिळावी, यासाठी वृक्षारोपण ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही स्वागत, सत्काराला बुके ऐवजी पुस्तक किंवा रोपटे स्वीकारण्याचा निर्णय आपण घेतला असून आता सत्काराला ‘बुके’ नको, तर बुक किंवा रोप द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींकडून किंवा कोणत्याही समारंभात जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत बुके देवून केले जाते. मात्र, आता जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी स्वागत, सत्कारामध्ये बुके ऐवजी पुस्तक किंवा रोपटे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि झाडांचे संगोपन होणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड ही चळवळ झाली तरच जिल्ह्यातील वृक्षांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यामुळे यापुढे सत्कार, स्वागताला बुके ऐवजी पुस्तक किंवा रोपटे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही विविध समारंभ आयोजित करताना बुके ऐवजी रोप किंवा पुस्तक देवूनच मान्यवरांचे स्वागत करावे. यानिमित्ताने जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि संगोपनास चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *