• Tue. Aug 19th, 2025

कोर्टात नाट्यमय घडामोडी, उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी, अखेर मोठा दिलासा

Byjantaadmin

Aug 21, 2023

खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरें आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झालाय. प्रत्येकी 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीसाठी हजर होते. राहुल शेवाळे यांचे आरोप मान्य नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी कोर्टात म्हटलं. या सुनावणीसाठी खासदार राहुल शेवाळे माझगाव कोर्टात दाखल झाले होते. तसेच संजय राऊत हे देखील कोर्टात आले होते.

कोर्टात नाट्यमय घडामोडी, उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी, अखेर मोठा दिलासा

विशेष म्हणजे या सुनावणीदरम्यान चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी सुनावणीवेळी उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्यावर आक्षेप घेतला होता. यावेळी वकिलांनी राहुल शेवाळे यांच्याशी फोनवर संवाद साधून आक्षेप मागे घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर राहिले.

न्यायाधीशांचे उद्धव ठाकरेंना सवाल

न्यायाधीशांनी कोर्टात आरोप वाचून दाखवले. त्यानंतर न्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांना महत्त्वाचा प्रश्न विचारला. तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का? असा प्रश्न न्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी माझ्यावर लावलेले आरोप कबूल नाहीत, असं कोर्टात सांगितलं.

अखेर ठाकरे आणि राऊत यांना जामीन मंजूर

कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांचे वकील आवश्यक तिथे सही करतील. उद्धव ठातरेंनी आपली साक्ष नोंदवली. त्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष संपली, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

आता पुढची सुनावणी कधी?

खासदार राहुल शेवाळे यांनी माझगाव कोर्टात मारहाणीची याचिका केली होती. तसेच ठाकरे गटाच्या ‘सामना’ मुखपत्रात माझ्याविषयी बदनामीकारक मजकूर छापून आला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माझी माफी मागावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांची होती. या प्रकरणात कोणत्याही प्रकरणाचा गुन्हा दाखल नाहीय. हे प्रकरण कोर्टाच्या अधिकारामध्ये येतं. त्यामुळे कोर्टाने स्वत:च्या अधिकारांचा वापर करुन 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे पुढची सुनावणी महत्त्वाची असणार आहे. याप्रकरणाची पुढची सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *