शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे कनिष्ठ अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. काहीजणांचा आव मोठा होता. पण डोळे वटारल्यानंतर ते पळून गेले. अन्याय सहन करायचा नाही आणि कुणीला केला तर त्याला जागेवर ठेवायचे नाही अशी आमची ओळख आहे, असे ते म्हणाले.
रायगडच्या पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते शिशिर शिंदे यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही लढवय्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काहीजणांचा आव मोठा होता. पण ते पळपुटे निघाले. डोळे वटारल्यानंतर लगेच ते पळाले. तुम्ही पळपुटे नाही, याचा अभिमान आहे. अन्यायावरती वार करणे, ही शिवसेनेची ख्याती आहे. अन्याय सहन करायचा नाही आणि कुणी अन्याय केला, तर त्याला जागेवर ठेवायचे नाही ही आपली ओळख आहे.

कर नाही, त्याला डर नाही
तुम्हालाही वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वच्छ होता आले असते. पण, तुम्ही त्यातले नाही. कर नाही, त्याला डर कशाला. वॉशिंग मशीनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही लढवय्यांच्या शिवसेनेत येणे पसंत केले. आता सगळे शिवसैनिक तुमच्या पाठिशी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेला मूर्खात काढण्याचा उद्योग सुरू
आपल्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत सत्ताबदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपन टिकत नाही असे म्हणतात. पण आपल्याला शहाणपणांची सत्ता आणायची आहे. सध्या जनतेला मूर्खात काढण्याचा उद्योग सुरू आहे. तो फार काळ चालणार नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
कोण आहेत शिशिर धारकर?
शिशिर धारकर पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. पेण अर्बन बँक घोटळ्यातील ते एक आरोपीही आहेत. या प्रकरणी 2018 मध्ये त्यांना ईडीने अटकही केली होती.

वाचा यासंबंधीची बातमी…
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा मुलगा ठाकरे गटात:शिशिर धारकर यांचा ठाकरे गटात प्रवेश, 250 गाड्यांच्या ताफ्यासह धडकले ‘मातोश्री’वर
पेणचे माजी नगराध्यक्ष तथा पेण अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी शिशिर धारकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. ते 250 गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यांच्यासोबत पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
राजकारणापासून झाले होते दूर
शिशिर धारकर यांनी गत काही वर्षांपासून राजकारणापासून अंतर राखले होते. पण आता ते ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा राजकारणाच्या मैदानात उतरलेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी पक्षासाठी अंग झटकून काम करण्याचा मानस व्यक्त केला.